Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! मिरजेत गणेश तलाव येथे तरुणाचा धारधार शस्त्राने खून

Big Breaking! मिरजेत गणेश तलाव येथे तरुणाचा धारधार शस्त्राने खून

मिरज शहरातील गणेश तलावाजवळ एकावर धारदार हत्यारांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला होता, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. निखिल कलगुटगी (रा. मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सात ते आठ हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्रथमदर्शनी यांच्याकडून मिळत आहे. टोळीयुद्धातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत माहिती अशी की, निखिल कलगुटगी याचा व काही जणांचा गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होता. याच वादातून त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निखिल याला काही जणांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गणेश तलाव येथे बोलावून घेतले होते. तो आल्यावर त्याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला केला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने निखिल रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.

याबाबत माहिती मिळताच निखिलच्या मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे निखिल याची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु त्याचा मृत्यू झाला, ही घटना कळताच शासकीय रुग्णालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, काही महिन्यापूर्वी मिरजेत गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेशी देखील निखिलच्या खुनाचा संदर्भ जोडला जात आहे. तसेच निखिल याचा एका राजकीय पक्षात प्रवेश होणार होता. तो मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन पक्षप्रवेश करणार होता. या कारणातून देखील त्याचा खून झाला का? असा देखील संशय व्यक्त होत आहे.

दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना करण्यात आली आहेत. मिरजेत पुन्हा टोळीयुद्ध सुरू झाल्याच्या चर्चेने नागरिक मात्र भयभीत झाले असून, शहरात तणावाचे वातावरण आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.