राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त टीकेमुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यातील जत येथे केलेल्या भाषणात पडळकर यांनी पाटील यांच्यावर कठोर शब्दांत टीका करताना काही मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. त्यांच्या या ताज्या विधानांमुळे, त्यांनी यापूर्वी नाभिक समाजाचा अपमान करणारे जे विधान केले होते, तो जुना मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे.
काय होते जुने विधान?
पडळकर यांनी जयंत पाटलांना लक्ष्य करताना अनेक वैयक्तिक आरोप केले. त्यांनी पाटलांना "बिनडोक" म्हटले आणि "मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो आहे, आणि हा एका चोराच्या पोटी जन्माला आला आहे" असे अत्यंत वादग्रस्त विधान केले. याशिवाय, पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर साखर कारखान्यांवर दरोडे टाकल्याचा आणि संभाजी पवार आप्पांचा कारखाना हडपल्याचा आरोपही केला.
'दाढ्या केल्या का?' - नाभिक समाजाच्या अपमानाचा जुना मुद्दा पुन्हा चर्चेत
पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका करताना
'दाढ्या केल्या का?' असा प्रश्न विचारला. "न शिकलेल्या आमच्या मेंढपाळाला
सुद्धा हे कळतं, मग याला कळत नाही का? हजामती करतो का? इतकंही कळत नाही,
महाराष्ट्रात इतकी वर्षे दाढ्या केल्या का?" अशा शब्दांत त्यांनी टीका केली
होती. त्यांच्या या विधानामुळे नाभिक समाजाचा अपमान झाल्याचे म्हटले गेले
होते. मात्र, त्यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल कोणतीही माफी मागितली
नव्हती किंवा दिलगिरी व्यक्त केली नव्हती.
जयंत पाटलांवर पुन्हा जहरी टीका
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. सांगली जिल्ह्याच्या जतमध्ये बोलताना पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप केले. गोपीचंद पडळकर यांच्या म्हणण्यानुसार, जयंत पाटील यांनी एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच, आपण कोणाकडून खंडणी घेतो का, याची माहिती काढण्यासाठी जयंत पाटील यांनी जतमध्ये माणसे पाठवली असल्याचाही आरोप पडळकर यांनी केला.या संदर्भात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका केली. 'जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे,' असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले. राजकीय टीका करताना महाराष्ट्राच्या राजकारणात पाळल्या जाणाऱ्या मर्यादेचे हे उल्लंघन असल्याची चर्चा होत आहे. पडळकर यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या अशा विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणावर पडळकर कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.