पुणे : राज्याचे महाधिवक्ता यांच्या अनुकूल अभिप्रायानंतर 'आधुनिक चिकित्सा औषधशास्त्र अभ्यासक्रम' (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (एमएमसी) करण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार 'एमएमसी'मध्ये स्वतंत्र नोंदवही ठेवून त्यांची नोंद करण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीच्या डॉक्टरांप्रमाणे सरसकट प्रॅक्टिस करता येणार नसून, त्यावर काही बंधने असल्याचे 'एमएमसी'ने स्पष्ट केले आहे.
'एमएमसी'मध्ये नोंद झालेल्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची नेमकी कोणत्या स्वरूपाची प्रॅक्टिस करता येईल याबाबत आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषद विचार करत आहे. खासकरून 'सीसीएमपी' अभ्यासक्रमात होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ज्या ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याबाबत प्रशिक्षण दिले, त्यापुरती मर्यादितच ही प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती 'एमएमसी'चे प्रशासक विंकी रुघवानी यांनी दिली. या अभ्यासक्रमात फार्माकोलॉजी, औषधांचे दुष्परिणाम, डोस, आपत्कालीन उपचार, संसर्गजन्य रोग, प्राथमिक आरोग्यसेवा यांचा समावेश असतो.
दरम्यान, ही नोंदणी करण्याबाबत ॲलोपॅथी
डॉक्टरांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या
(आयएमए) महाराष्ट्र शाखेने निषेध व्यक्त केला आहे. याबाबत
न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या आदेशाची वाट न पाहता तसेच राज्य
शासनाने याबाबत गठित केलेल्या समितीचा अहवाल येण्याआधीच ही नोंदणी
करण्याची मागणी होमिओपॅथी डॉक्टरांकडून होत असल्याबाबत त्यांनी विरोध
केला आहे.
ही नोंदणी केली तरी होमिओपॅथीच्या 'सीसीएमपी' अर्हताधारकांना कुठलेही ॲलोपॅथिक औषध देण्याचा वैधानिक अधिकार प्राप्त होत नाही, हे न्यायालयाने २०१४ मध्येच स्पष्ट केले आहे. मग हा नोंदणीचा अट्टाहास निर्णयापूर्वीच केला जात असून यामागे होमिओपॅथी महाविद्यालयामधील प्रवेशाचे अर्थकारण कारणीभूत असावे. 'आयएमए' महाराष्ट्रने नेहमीच मिश्रपॅथीचा विरोध केलेला असून, केवळ सहा महिन्याच्या 'सीसीएमपी' अभ्यासक्रमानंतर ॲलोपॅथिक औषधे देणे हे जनतेच्या आरोग्यास बाधक ठरू शकते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या सरकारने त्यांच्या नोंदणीचा अट्टाहास धरू नये.- डॉ. संतोष कदम, सचिव, आयएमए, महाराष्ट्र'सीसीएमपी' अर्हताधारकांची स्वतंत्र नोंदवहीत नोंदणी करण्याबाबतचे पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे. नोंदणी केल्यावरही त्यात पूर्ण ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येणार नाही. त्यामध्येही मर्यादा आहेत. त्यांना दिलेल्या अभ्यासक्रमात काय शिकवले, याबाबत अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल.- डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, एमएमसीसर्वसामान्यांना जे काही आवश्यक ॲलोपॅथीचे उपचार हवे असतात, ते सर्व आम्हाला करता येतील. परंतु गर्भपात, शस्त्रक्रिया हे तर 'एमबीबीएस' झालेल्या डॉक्टरांनाही करता येत नाहीत. अशा महत्त्वाच्या शस्त्रक्रिया आम्हीही करणार नाही. याबाबत 'सीसीएमपी'च्या अभ्यासक्रमामध्ये नमूद आहेत. त्यासाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही.- डॉ. बाहुबली शहा, प्रशासक, होमिओपॅथी परिषद
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.