सांगली : गुन्हा आणि गुन्हेगार तपास प्रणालीत सांगलीत पोलिसांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याप्रकरणी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याहस्ते सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
पुण्यात शनिवारी 'पोलिस कर्तव्य मेळावा 2025'चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सांगली पोलिसांचा गौरव करण्यात आला. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे कामकाज हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे पार पाडण्यात येत आहे. यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. यासाठी सहायक निरीक्षक रुपाली बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पथकाकडील नितीन बराले, सलमा इनामदार यांनी अत्यंत उत्कृष्टपणे हे कामकाज पार पाडले. त्यामुळे सांगली पोलिस दलातील कामकाजात सुसूत्रता आली. सांगली पोलिस दलाने सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सलग 14 वेळा प्रथम तीन क्रमांकात राहण्याचा बहुमान मिळवला आहे. सन 2024-25 या वर्षात सांगली पोलिस दलाचा प्रथम क्रमांक आला आहे. त्यामुळे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याहस्ते पारितोषिक देऊन सांगली पोलिस दलास गौरविण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.