सांगली : स्वर्गीय राजारामबापू पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून टीका केली होती. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला. यावेळी खासदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार उपस्थित होते. या मोर्चात अपक्ष खासदार विशाल पाटील, पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह महाविकास आघाडीतील नेतेही सहभागी झाले.
गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघात बोलताना, जयंत पाटील यांच्यावर अवमानकारक टीका केली होती. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. गोपीचंद हा काही जयंत पाटील सारख्या भिकाऱ्याची औलाद नाही. काहीतरी गडबड असून जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे, असे वक्तव्य पडळकर यांनी केले होते. या वक्तव्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आक्षेप नोंदवला होता. पवारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला होता.
'हे कुणाच्या ताकदीवर बोलतात'- निलेश लंके
आज सांगलीत पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने भव्य मोर्चा काढला. यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकारण दूषित करण्याचे काम सुरू आहे. कुणावर व्यक्तिगत टीका करणे, हे काही योग्य नाही. वाचाळवीरानी खालच्या पातळीवर टीका केली. दुसऱ्याला खड्डा खोदताना आपणही त्यात जाऊ शकतो. हे कुणाच्या ताकदीवर बोलतात हे शोधावे लागेल. सुसंस्कृतपणा या राज्यात राहिला नाही. त्यांनी शेतकरी प्रश्नही भाष्य केले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली असल्याचे ते म्हणाले.
'हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही'- जितेंद्र आव्हाड
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही जोरदार टीकास्त्र सोडले. ''एखाद्याच्या मातृत्व आणि पितृत्वावर जाऊन टीका करणे हे, महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधीच घडलेच नाही. खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. ह्या खालच्या पातळीवर होणाऱ्या टीकेमुळे महाराष्ट्रालादेखील दुःख झाले आहे. मी आणि जयंत पाटील प्रचंड मातृभक्त आहोत. महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालली आहे. महाराष्ट्राची संस्कृती लयाला गेली आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीने निच्चांकी पातळी गाठली आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही,'' अशा शब्दांत आव्हाड यांनी सुनावले.राजकारणात एक दुसऱ्याचा सन्मान करावा. राजकारणात मतभेद असतात. आमच्याकडून अशी टीका झाली असती तर आमच्या मनात भीती असते. कारण शरद पवार आहेत. साहेब आम्हाला फोन करतील, याची भीती असते. साहेब आमचे कान पकडतील याची भीती असते. राजारामबापू पाटील हे खूप मोठे व्यक्तिमत्व होते. राजकारणातील नेतृत्व आई-बापाप्रमाणे असते. कुठल्याही नेतृत्वावर आई आणि बापाबद्दल टीका करणे योग्य नाही. गोपीचंद पडळकर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. पोलीस कारवाई करणार नाहीत, हे आम्हालाही माहीत आहे, असे आव्हाड म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.