जालना जिल्ह्यातील भोकरदन महसूल विभागाच्या नाजा सज्याच्या तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या' अर्जावर सही आणि शिक्का देण्यासाठी चक्क तलाठी महाशयाने बियर बारच्या बिल भरण्याची मागणी केली. नातेवाईकांनी बिल भरण्यास नाकार दिल्याने तलाठ्याने मद्यधुंद अवस्थेत बियर बार मध्येच उभा राहून अर्जावर केलेली सही खोडल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा गावातील विकलांग असलेल्या सुनीता जाधव या महिलेने नातेवाईकांच्या मदतीने "इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून अर्ज केला.मात्र या अर्जावर तलाठी यांची स्वाक्षरी आणि शिक्का लागत असल्याने महिलेने वारंवार तलाठ्यांशी संपर्क केला.मात्र तलाठी भेटत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांनी फोन करून सही आणि शिक्क्याची मागणी केली. दरम्यान बियर बार मध्ये बसलेल्या तलाठ्यांनी नातेवाईकांना बार वर बोलावून घेत नशेच्या अवस्थेत पैशाची मागणी केली. तसेच नातेवाईकांना सोबत बसा म्हणत नशेच्या अवस्थेत बारचं बिल भरण्यास सांगितली. आणि अर्जावर सही देखील केली.नातेवाईक बिल भरणार नसल्याचं लक्षात येताच तलाठी महाशयाने चक्क अर्जावरील सही खोडली. शिवाय बार मध्येच अर्ज करणाऱ्या महिलेला सामोरं आणा म्हणत महिलेला बार मध्ये बोलवण्याचा हट्ट धरला. तलाठीने संबंधित महिलेच्या नातेवाईकांना कसा अर्ज मंजूर होतो अशी धमकी देखील दिली. हा संपूर्ण प्रकार महिलेच्या नातेवाईकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. दरम्यान तलाठ्याने एका सहीसाठी दाखवलेला माजुर्डेपणा उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर पोलीस या तलाठीवर कशाप्रकारची कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.