पुणे: मागील दीड वर्षांपासून फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी गैरव्यवहारातील आरोपी संचालिका अर्चना सुरेश कुटे आणि आशा पद्माकर पाटोदेकर या दोघींना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने मंगळवारी (ता.१६) पुण्यातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दागिने आणि रोकड असा सुमारे दोन कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील गैरव्यवहारप्रकरणी संस्थेविरुद्ध मे २०२५ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान ९५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषणच्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राकडून करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटेला यापूर्वीच अटक झाली होती. मात्र, त्याची पत्नी आणि कुटे ग्रुपची संचालिका अर्चना कुटे (रा. कुटेवाडी, जि. बीड) आणि संचालिका आशा पाटोदेकर (रा. पाटोदा, जि. बीड) यांचा शोध घेण्यात येत होता.
पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी अर्चना कुटेच्या घरावर छापा टाकला. त्यात दोन कोटी १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये ६० सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ८० लाख ९० हजार रुपये), २७० चांदीचे दागिने (किंमत ५६ लाख ७५ हजार रुपये), ६३ लाखांची रोकड आणि १० लाख रुपये किमतीच्या एका महागड्या दुचाकीचा समावेश आहे.ज्ञानराधा मल्टिस्टेट गैरव्यवहारातील संबंधित प्रकरणांत आतापर्यंत १३ पैकी ९ संचालकांना अटक झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखा, बीड आणि गुन्हे अन्वेषण विभागाने तयार करून एकूण २०७ मालमत्तांच्या जप्तीचे प्रस्ताव पुढील कारवाईसाठी सादर केले आहेत. ही कारवाई अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद, पोलिस उपमहानिरीक्षक अमोघ गावकर, पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात अतिरिक्त पोलिस अधीक्षक किरण पाटील, उपअधीक्षक स्वाती थोरात, पोलिस निरीक्षक विजय पणदे, पोलिस हवालदार कारभारी गाडेकर, देवचंद घुणावत आणि सय्यद रफिक यांचा समावेश होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.