Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अपंगत्व मर्यादा नसून नवी संधी - चंद्रकांत पाटील

अपंगत्व मर्यादा नसून नवी संधी - चंद्रकांत पाटील
 

सांगली : अपंगत्व ही मर्यादा नसून, ती नवी संधी आहे. अपंगांनी आपल्यात दडलेले कलागुण समाजासमोर आणून आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने जीवन जगावे, असा संदेश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. अपंगांना युनिफाईड डिसॅबिलिटी आयडी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्यासह दिव्यांग शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, लाभार्थी उपस्थित होते.

जिल्ह्यात ४२ हजारांहून अधिक व्यक्तिंनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी ३० हजार ५२१ दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले आहे. यामधील काही दिव्यांगांना प्रातिनिधीक स्वरूपात युडीआयडी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दिव्यांग व्यक्तिंना या प्रमाणपत्रामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग व्यक्तींना ५ टक्के आरक्षण, एसटी व रेल्वेमध्ये सवलत यासह अनेक योजना दिव्यांगांसाठी आहेत. या योजनांची सर्वसमावेशक माहिती दिव्यांगांना उपलब्ध करून द्यावी. शासन व प्रशासन दिव्यांगांच्या पाठिशी असून, यंत्रणांनी दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

दिव्यांगांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता, शारीरिक उणिवांची खंत न बाळगता आत्मविडासाने जगावे, असा मूलमंत्र देताना पालकमंत्री पाटील यांनी केंद्र व राज्य लोकसेवा आयोगात दिव्यांगांनी मिळवलेल्या यशाची माहिती देत उपस्थितांना प्रेरणा दिली. जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, दिव्यांग व्यक्तिंना युडीआयडी कार्डमुळे सर्व लाभ मिळणार आहे. या कार्डचा डेटा देशपातळीवर असून, देशातील कोणत्याही राज्यात दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात यासाठी शिबिरे घेण्यात आली असून, ज्या व्यक्तिचे किमान ४० टक्के अपंगत्व आहे अशांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबरोबरच सामाजिक सहाय्य योजनांचा लाभ दिव्यांगांना देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ४० दिव्यांगांना प्रातिनिधीक स्वरूपात युडीआयडी वाटप करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपास जल अर्पण करण्यात आले.यावेळी रामदास कोळी व अमोल चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त केले दिव्यांगांना युडीआयडी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते वुई फौंडेशनचे दिनेश कदम यांचा सत्कार करण्यात आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.