महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी अचानक राजीनामा दिला आहे. मंगळवारी (16 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना सराफ यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. महाराष्ट्र सरकारची उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यांची आणि महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देण्याची मुख्य जबाबदारी सराफ यांच्यावर होती.
वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सराफ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवले. दरम्यान, पुढील व्यवस्था होईपर्यंत फडणवीस यांनी त्यांना काम पाहण्याची विनंती केली होती. त्यानुसार, सराफ आता जानेवारी महिन्यापर्यंत काम पाहणार आहेत. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयात सराफ यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
कोण आहेत बिरेंद्र सराफ?
सराफ यांना डिसेंबर 2022 मध्ये महाधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यापूर्वी 25 वर्षे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. पदवीच्या तिन्ही वर्षात ते मुंबई विद्यापीठात अव्वल ठरले होते. सुरुवातीला कनिष्ठ वकील म्हणून त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या चेंबरमध्ये काम केले.2020 मध्ये सराफ यांची ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 6 वर्षे बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून आणि काही वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांची राज्याचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. जवळपास 3 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये सराफ यांनी अनेक महत्वपूर्ण खटल्यांचे कामकाज पाहिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.