पंचनामे अपूर्ण, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत अशक्यच! थकबाकीमुळे २७
लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद, कर्जवसुलीचे लिखित आदेश नाहीतच
सोलापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबरमध्येच २७ जिल्ह्यांमधील ३५ लाख हेक्टरवरील पिके वाया गेली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, अशी ग्वाही सरकारने दिली. जिल्ह्यातील चार लाख हेक्टरवरील पिकांचे पुरामुळे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात झाली आहे. अख्खा खरीप वाया गेला आणि आता रब्बीची पेरणीही लांबल्याची स्थिती आहे. महापुरामुळे १८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले, अनेकांची जनावरे, घरातील संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले.
पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनीतील माती खरडून गेली, घरांना चिरा पडल्या, वाहनांचे नुकसान झाले, अशी विदारक स्थिती नदीकाठच्या गावांमध्ये पाहायला मिळत आहे. सुमारे १०२ महसूल मंडलांमध्ये एकाच महिन्यात दोन-तीनवेळा अतिवृष्टी (६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस) झाली आहे. तरीदेखील, अजूनही पंचनामे सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल की नाही? याची चिंता बाधित शेतकऱ्यांना सतावत आहे.
पंचनामे पूर्ण होण्यासाठी आणखी दिवस लागतील
अतिवृष्टी व पुरामुळे अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाता येत नाही. अजूनही बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरुच असून ते पूर्ण झाल्यावर अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविला जाईल. त्यासाठी आणखी काही दिवस लागतील.
- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
थकबाकी वसुलीस स्थगिती, पण तोंडीच
राज्यभरातील २८ लाख शेतकऱ्यांकडे ३५ हजार कोटींची थकबाकी आहे. अशातच यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही. अडचणीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांना बॅंका व खासगी सावकारांच्या थकबाकीची चिंता सतावू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जाच्या थकबाकीला स्थगिती दिल्याचे सांगितले, पण तसा कोणताही लिखित स्वरूपातील आदेश आम्हाला मिळालेला नाही, असे बॅंकांचे अधिकारी सांगत आहेत.
सप्टेंबरमधील अतिवृष्टीची स्थिती
बाधित जिल्हे
२७
एकूण बाधित क्षेत्र
३५.१६ लाख हेक्टर
अंदाजे नुकसान
५२,००० कोटी
पंचनामे अंतिम झालेले जिल्हे
0000
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.