केरळमध्ये २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरनं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. कोट्टायम इथं राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह तिरुवनंतपुरम इथल्या थंपानूरमध्ये एका लॉजवर आढळून आला. इन्स्टाग्रामवर तरुणाने मृत्यूआधी पोस्ट करत आरएसएसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. संघाच्या शाखेत लैंगिक शोषण झाल्याचा
आरोप त्यानं केला होता.तरुणाचं नाव आनंदु अजी असं आहे. त्याच्या सुसाइड
नोटमध्ये लिहिलं की, वडिलांनी लहानपणीच आरएसएसमध्ये टाकलं होतं. तिथं
लैंगिक आणि शारीरिक शोषणाचा सामना करावा लागला. शेजारी एनएमकडून तीन वर्षे
वय असल्यापासून छळ केला. आरएसएसच्या आयटीसी आणि ओटीसी कँपमध्येही असंच
घडलं.
माझ्या मृत्यूचं कारण संबंध बिघडल्यानं
किंवा प्रेमात अपयश हे नाहीय तर मनावर मोठा आघात हे आहे. काही वर्षांपूर्वी
ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव डिसऑर्डर झाल्याचं निदान झालं होतं. पुढे अशी माहिती
समोर आली की आरएसएसच्या लोकांकडून शोषण करण्यात आलं. आता या प्रकरणावरून
काँग्रेसने आरएसएसवर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणातील दोषींना शिक्षा
व्हावी अशी मागणी काँग्रेसने केलीय.
तरुणाने त्याच्या नोटमध्ये लिहिलंय की आरएसएसकडून आयुष्यभराच्या वेदना मिळाल्या. मी कुणावरही नाराज नाही, फक्त एक व्यक्ती आणि संघटनेवर नाराजी आहे. एनएम आरएसएसचा सक्रीय सदस्य होता आणि तो सतत लैंगिक शोषण करत होता. कॅम्पमध्ये लैंगिक शोषण करताना त्यानं काठीनं मारहाणही केली. आरएसएससारखी दुसऱ्या कोणत्या संस्थेबाबत इतका द्वेष नाही. आरएसएसवाल्यांसोबत मैत्री करू नका, वडील, भाऊ किंवा मुलगा जरी असले तरी दूर ठेवा. कँपमध्ये खूप शोषण होतं, बाहेर पडल्यानं मी बोलू शकलो. पुरावे नाही म्हणून कोणी मान्य करणार नाही पण माझं आयुष्यच पुरावा आहे.आनंदुने त्याच्या सुसाइड नोटमधून पालकांना सल्ला दिला की, मुलांसोबत वेळ घालवा आणि नातं भक्कम करा. मुलं घाबरून गप्प बसू नयेत. मुलांच्या मनात बसलेली भीती कधीच जात नाही. जगातल्या कोणत्याच मुलानं हे दु:ख सहन करू नये. पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीच्या तपासात अशी माहिती समोर आलीय की त्याने कुणालाच लैंगिक शोषणाबद्दल सांगितलं नाही. कुटुंबालाही याची काही माहिती नव्हती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.