महाराष्ट्रामधील जिल्हापरिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकांची आज सायंकाळी घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये 29 पालिकांच्या निवडणुकीच्या तारखांची एकाच वेळी घोषणा होईल असं सांगितलं जात आहे.
किती वाजता होणार घोषणा?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद, असा निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकाराचा विषय आहे. "राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत," असं राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. ही पत्रकार परिषद मुंबईमधील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहामध्ये दुपारी चार वाजता पार पडणार आहे.
29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात
नागपूर, चंद्रपूर या दोन महापालिकांची निवडणूक आरक्षण मर्यादेच्या मुद्यामुळे नंतर होईल आणि अन्य 27 महापालिकांची निवडणूक एकत्रित होईल, असे म्हटले जात असले तरी सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणतः जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यासाठीचे मतदान होईल, असे म्हटले जात आहे.
न्यायालयाने निकालात कुठेही म्हटलेले नाही की...
नागपूर आणि चंद्रपूर, या दोनच महापालिका अशा आहेत की, जिथे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे येथे आधी 50 टक्क्यांच्या आत आरक्षण दिले जाईल, अशा पद्धतीने पुनर्रचना करून मगच तेथे निवडणूक घेतली जाईल, असा तर्क होता. मात्र, आयोगाच्या सूत्रांनी त्याचा इन्कार केला. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे, अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये, असे न्यायालयाने निकालात कुठेही म्हटलेले नाही. ही मर्यादा ओलांडलेल्या महापालिकांमध्ये निवडणूक घेता येईल आणि निकालदेखील जाहीर करता येईल; पण हा निकाल ओबीसी आरक्षण आणि 50 टक्क्यांची ओलांडलेली मर्यादा याबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल.
निवडणूक अधिकारी ठरले
राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी महापालिकांना निवडणूक अधिकारी आणि सहायक अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला होता. त्यानुसार या अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.