जत : येथील श्री यल्लमा देवीच्या यात्रेच्या धावपळीत शुक्रवारी सकाळी एका 23 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विकास मलकारी टकले (रा. घुगे वस्ती, उमदी) असे मृताचे नाव असून, त्याचा मृतदेह जनावरांच्या बाजार समितीच्या आवारात विवस्त्र अवस्थेत आढळून आला.
जमिनीच्या वादातून भावकीनेच हा खून केल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत विकासची आई तीर्थाबाई यांची प्रकृती बिघडल्याने तो त्यांना घेऊन गुरुवारी उमदीहून जत येथे आला होता. खासगी रुग्णालयात आईला उपचारासाठी दाखल केल्यानंतर, 'देवीच्या दर्शनाला जाऊन येतो आणि गावी परततो', असे सांगून तो बाहेर पडला. गुरुवारी सायंकाळी तो आरळी कॉर्नर परिसरात नातेवाईकांना दिसला होता. मात्र, शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेहच आढळून आला. आईसोबतची दवाखान्यातील भेट हीच त्याची शेवटची भेट ठरली.शुक्रवारी सकाळी जनावरांच्या बाजार समितीच्या आवारात विवस्त्र अवस्थेत मृतदेह मिळून आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. चौकशीदरम्यान, हा मृतदेह उमदी येथील विकास टकले याचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले, निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. विकासच्या डोक्यावर आणि तोंडावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. यावेळी रुग्णालयात आई आणि बहिणीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जत पोलिसांची दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
संशयाची सुई भावकीतील जमिनीच्या वादाकडे
आमच्या भावकीत जमिनीचा जुना वाद असून त्याच वादातून भावकीनेच विकासचा खून केला आहे, असा आरोप विकास याची आई व बहिणीने केला आहे. या आरोपाच्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळी नातेवाईकांनी, विकास याचा खून जमीन वादातून झाल्याचा आरोप केला. उमदी येथील सात एकर जमिनीचा वाद गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्याच भावकीसोबत सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.