Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता फाशीच्या शिक्षेऐवजी लवकरच 'ही' नवी शिक्षा दिली जाणार? सर्वोच्च न्यायालयाने.

आता फाशीच्या शिक्षेऐवजी लवकरच 'ही' नवी शिक्षा दिली जाणार? सर्वोच्च न्यायालयाने.


नागपूर : भारतात अत्यंत क्रूर गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा दिली जाते. फाशीची शिक्षा ही अतिशय वेदनादायी असल्याचा युक्तिवाद करत त्या ऐवजी नवी शिक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

फाशीची शिक्षा 'गळफास' पद्धतीने देण्याच्या प्रचलित प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर अलिकडेच न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञ समिती नेमण्याबाबत विचार व्यक्त करत, गळफासामुळे होणाऱ्या वेदना, मृत्यू होण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनसुविधांची माहिती केंद्र सरकारकडून मागवली होती. त्यानंतर मे २०२३ मध्ये अ‍ॅटर्नी जनरल यांनी, मृत्युदंडाच्या अंमलबजावणीसाठी अधिक योग्य पर्याय आहेत का, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापण्याची शिफारस केल्याचे न्यायालयाला सांगितले होते. न्या. संदीप मेहता यांनी फाशीच्या प्रक्रियेचा 'मानसिक परिणाम' फाशी देणाऱ्या व्यक्तींवर होतो, याकडे लक्ष वेधले. "ही प्रक्रिया पाहणाऱ्यांसाठीही अतिशय गंभीर आणि अस्वस्थ करणारी असते," असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

गळफासचा पर्याय काय?
याचिकेत दावा करण्यात आला आहे की, गळफासाच्या प्रक्रियेत मृत घोषित होण्यासाठी ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागू शकतो, तर गोळीबारात काही मिनिटांत आणि लेथल इंजेक्शनमध्ये अवघ्या पाच मिनिटांत प्रक्रिया पूर्ण होते. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने केलेल्या ठरावांचा हवाला देत, "मृत्युदंडाची अंमलबजावणी करताना किमान वेदना होतील, याची काळजी घेतली पाहिजे," असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या जनहित याचिकेत मृत्युदंडाची अंमलबजावणी 'गळफास' पद्धतीने करणे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही पद्धत "दीर्घकाळ चालणाऱ्या वेदना आणि अमानुष यातना" देणारी असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्याऐवजी लेथल इंजेक्शन, गोळीबार, विद्युतदंड किंवा गॅस चेंबर अशा पद्धतींचा अवलंब करण्याची मागणी करण्यात आली असून, या पद्धतींमध्ये काही मिनिटांत मृत्यू होतो, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

मागील वर्षी याचिकाकर्त्याने दावा केला होता की, अमेरिकेतील ५० पैकी ४९ राज्यांनी गळफासाऐवजी लेथल इंजेक्शनचा अवलंब केला आहे. "किमान दोषी व्यक्तीला पर्याय तरी द्या, गळफास की लेथल इंजेक्शन. लेथल इंजेक्शन जलद, मानवी आणि सुसंस्कृत आहे; गळफास मात्र क्रूर, अमानवी आणि दीर्घकाळ चालणारा आहे. जवळपास ४० मिनिटे शरीर दोरीवर तडफडत राहते," असा युक्तिवाद त्यांनी केला होता. सशस्त्र दलांमध्ये असा पर्याय दिला जातो, हेही त्यांनी अधोरेखित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय राखून ठेवला असून लवकरच गळफास ऐवजी इतर पर्याय अवलंबले जातील काय, याबाबत चित्र अधिक स्पष्ट होईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.