Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :- माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण

मुंबई :- माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण
 

डोंबिवलीतून एक खळबळजनक घटना समोर आली असून एका तरुण विद्यार्थिनीच्या बँक खात्यात तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःच्या खात्यात एवढी मोठी रक्कम आली कशी, असा सवाल करत या विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे. आता या प्रकरणात मनसेने उडी घेतल्याने प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काय आहे प्रकरण?
डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात राहणारी निधी तिवारी ही विद्यार्थिनी कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. निधीची मैत्रीण चांदनी सिंह ही आरबीएल बँकेत कार्यरत आहे. चांदनीने तिला बँक खाते उघडण्याचे टारगेट असल्याचे सांगून निधीला विश्वासात घेतले आणि तिची तीन वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली. खाते उघडण्यासाठी चांदनीने निधीला काही पैसेही दिले होते. मात्र, काही दिवसांनंतर निधीला तिच्या एका खात्यात 2 कोटी 60 लाख रुपये आणि दुसऱ्या खात्यात 10 लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याचे समजले, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला.
उत्तराखंड कनेक्शन

निधीने या व्यवहारांबाबत चांदनीकडे विचारणा केली, तेव्हा तिने उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. निधीने स्वतः या प्रकरणाचा शोध घेतला असता, तिला धक्कादायक माहिती मिळाली. उत्तराखंडमधील सामान्य नागरिकांची फसवणूक करून जमा झालेली रक्कम निधीच्या खात्यात वळवण्यात आली होती आणि तिथून ती वापरली गेली होती. या संपूर्ण रॅकेटमध्ये उल्हासनगरमधील एका व्यक्तीचा समावेश असल्याचेही समोर आले असून निधीने या सर्व बाबींची माहिती पोलिसांना दिली आहे.

मनसे आक्रमक
गेल्या 3 महिन्यांपासून निधी न्यायासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे, परंतु पोलीस ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी तिने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री सायबर गुन्हे रोखण्यासाठी मोठ्या घोषणा करतात, मग एका विद्यार्थिनीसोबत इतका मोठा प्रकार घडूनही पोलीस दखल का घेत नाहीत, असा सवाल जाधव यांनी विचारला आहे. संशयित आरोपीला पोलीस ठाण्यात बोलावूनही त्याला कारवाईविना सोडून का दिले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकरणावर रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणाबाबत संबंधित तरुणीचा अर्ज प्राप्त झाला असून, त्या अर्जाच्या आधारे चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, इतक्या मोठ्या रक्कमेचे व्यवहार होऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता मनसेच्या हस्तक्षेपानंतर पोलीस या प्रकरणाचा छडा लावून पीडित विद्यार्थिनीला आणि फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.