Big Breaking! इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात शाळेवर बॉम्ब; 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू, इराणमध्ये हळहळ
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मिनाब शहरातील एका शाळेवर बॉम्ब पडला असून या हल्ल्यात कमीत कमी २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या प्रांतीय राज्यपालांनी तस्नीम या इराणी वृत्तसंस्थेला दिली. निरपराध विद्यार्थ्यांचे बळी गेल्याने संपूर्ण इराणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
शाळेवर थेट हल्ला
मिनाब हे इराणच्या दक्षिणेकडील होर्मोझगान प्रांतातील शहर आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यात या शाळेला थेट लक्ष्य करण्यात आले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती असून बचावकार्य सुरू आहे.
सर्वोच्च नेते खामेनी तेहरानबाहेर सुरक्षित ठिकाणी
शाळेवरील हल्ल्यासह तेहरानमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाले. सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या कार्यालयाजवळही हल्ले झाल्याचे वृत्त आहे. मात्र खामेनी सध्या तेहरानबाहेर सुरक्षित ठिकाणी असल्याचे इराणी माध्यमांनी सांगितले. अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हेही सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली.
इराणने या हल्ल्यांना तातडीने
प्रत्युत्तर दिले. इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इस्रायल
संरक्षण दलाने (IDF) सांगितले की, “इराणकडून इस्रायलच्या भूभागावर
क्षेपणास्त्रे डागण्यात आली असून ती रोखण्यासाठी संरक्षण यंत्रणा कार्यरत
आहे.” जेरुसलेममध्ये सायरन वाजवण्यात आले आणि नागरिकांना “अत्यंत गंभीर”
धोक्याचा इशारा देण्यात आला.
“सावध राहा, घराबाहेर पडू नका”; इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचा इशारा
युद्ध आणखी चिघळणार
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या “मोठ्या लष्करी कारवाईस” सुरुवात झाल्याचे जाहीर केले. ही कारवाई अनेक दिवस सुरू राहण्याची शक्यता रॉयटर्सने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वर्तवली आहे. इराणचे समर्थक असलेले येमेनमधील हुथी बंडखोरही आजच इस्रायल आणि शिपिंग मार्गांवर हल्ले करू शकतात, असे वृत्तसंस्था AP ने सांगितले आहे. ट्रम्प यांनी स्वतः मान्य केले की या कारवाईत अमेरिकी सैनिकांचे बळी जाण्याचीही शक्यता आहे. शाळेवरील हल्ल्यात निरपराध मुलांचे बळी गेल्याने हे युद्ध आता केवळ लष्करी संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही - त्याच्या झळा सामान्य नागरिकांपर्यंत, विशेषतः लहान मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत.
मध्यपूर्वेत ९७ लाख भारतीय
परराष्ट्र
मंत्रालयाच्या जानेवारी २०२५ च्या आकडेवारीनुसार, मध्यपूर्वेत सुमारे ९७
लाख भारतीय राहतात. यामध्ये संयुक्त अरब अमिराती (३९ लाख), सौदी अरेबिया
(२७.५ लाख), कुवेत (१०.१ लाख), कतार (८.३ लाख), ओमान (६.६ लाख) आणि बहरीन
(३.५ लाख) यांचा समावेश आहे. इराणमध्ये १०,७६५ तर इस्रायलमध्ये १,२३,०००
भारतीय आहेत. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाची कारणे हे युद्ध एका दिवसात उद्भवलेले नाही. गेल्या कित्येक दशकांच्या राजकीय, धार्मिक आणि भू-राजनीतिक तणावाचा हा स्फोट आहे.
१. इराणचा अणुकार्यक्रम –
इराण अणुबॉम्ब बनवत असल्याचा अमेरिका आणि इस्रायलचा आरोप आहे. इराण मात्र हा कार्यक्रम शांततापूर्ण असल्याचे सांगतो. २०१५ मध्ये झालेला अणुकरार ट्रम्प यांनी २०१८ मध्ये मोडला. त्यानंतर इराणने युरेनियम समृद्धीकरण पुन्हा सुरू केले. इस्रायलसाठी हा सर्वात मोठा धोका आहे कारण इराणने वेळोवेळी इस्रायलला नकाशावरून मिटवण्याची भाषा केली आहे.
२. इराणचे प्रादेशिक वर्चस्व –
इराण
लेबनॉनमधील हेझबोल्लाह, येमेनमधील हुथी, इराकमधील शिया मिलिशिया आणि हमास
यांना शस्त्रे व पैसा पुरवतो. इस्रायल आणि अमेरिकेच्या दृष्टीने हे सर्व गट
दहशतवादी संघटना आहेत. इराणने मध्यपूर्वेत आपला प्रभाव वाढवत नेला, जे
अमेरिकेला आणि इस्रायलला मान्य नव्हते.
३. ऑक्टोबर २०२३ नंतरचे वातावरण –
हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण मध्यपूर्वेत आग पसरली. इस्रायलने गाझावर युद्ध सुरू केले. हेझबोल्लाह, हुथी आणि इराण यांनी इस्रायलवर हल्ले सुरू केले. इस्रायलने हेझबोल्लाहचे नेते नसरल्लाह आणि हमासचे नेते हनियेह यांना ठार केले. इराणने थेट इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. हा तणाव सतत वाढतच राहिला.
४. इराणच्या लष्करी नेत्यांची हत्या
इराणचे
वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ यांच्या हत्यांसाठी इराण
इस्रायलला जबाबदार धरतो. जनरल बाघेरी यांच्यासह अनेक प्रमुख नेते मारले
गेले. यामुळे इराणमध्ये इस्रायलविरुद्ध प्रचंड रोष आहे.
५. ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा –
ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी इराणबाबत कठोर भूमिका घेतली. वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी हल्ल्याचा इशारा दिला होता. “इराण अणुबॉम्ब बनवण्यापूर्वीच त्यांना रोखायचे” हे अमेरिका आणि इस्रायलचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, अणुकार्यक्रम, प्रादेशिक वर्चस्व, दहशतवादी गटांना पाठिंबा आणि दशकांचा राग, या सगळ्याचा एकत्रित स्फोट म्हणजे आजचे हे युद्ध आहे. यात कोणीच एकट्याने दोषी नाही. पण त्याची किंमत मात्र सामान्य माणूस भरतोय, मग तो इराणच्या शाळेतला विद्यार्थी असो किंवा मध्यपूर्वेत अडकलेला भारतीय कामगार.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.