सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशासनाच्या उपस्थितीत पदभार स्वीकृतीची औपचारिकता पार पडली.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदूम यांनी सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांचा सर्वांगीण व समतोल विकास साधण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनासोबत समन्वय ठेवून काम करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याचा निर्धार नव्या नेतृत्वाने व्यक्त केला. येत्या कालावधीत प्रलंबित विकासकामांना गती देत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस निर्णय घेण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या वेळी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका परिसरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नव्या नेतृत्वामुळे सांगली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.