Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : मुदत खरेदी दस्तांची नोंद करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना एकाला अटक

सांगली : मुदत खरेदी दस्तांची नोंद करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना एकाला अटक 
 

तासगाव : मुदत खरेदी दस्तांची नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना शिरगाव (विसापूर) येथील संजय शंकर पवार (वय 56, रा. बस स्टँडजवळ, शिरगाव, ता. तासगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम तासगाव पोलिसांत सुरू होते. तक्रारदार यांच्या वडिलांनी गहाणस्वरूपी मुदत खरेदीने दिलेली जमीन तक्रारदार व त्यांच्या बहिणीने दस्त करून घेतली आहे. या दस्तांची नोंद तलाठी कार्यालयात होण्यासाठी तक्रारदार यांनी कार्यालयातील खासगी व्यक्ती संशयित संजय पवार याची भेट घेतली.

 
तक्रारदार यांनी दस्तांची नोंद होण्याबाबत संशयित पवार याच्याकडे अर्ज दाखल केला. संशयित पवार याने नोंद घालण्यासाठी व सात-बारा देण्यासाठी स्वतःसह तलाठी शिरगाव याच्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी ‌'लाचलुचपत‌'कडे तक्रार दिली.याची पडताळणी केली असता, संशयित पवार याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. याबाबत 10 हजार रुपयांची लाच घेताना संशयित पवार यास रंगेहात पकडण्यात आले. पोलिस उपअधीक्षक यास्मिन इनामदार, पोलिस निरीक्षक किशोरकुमार खाडे, योगेश चव्हाण, कर्मचारी प्रीतम चौगुले, अजित पाटील, रामहरी वाघमोडे, ऋषिकेश बडनिकर, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सागर नाईकवडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.