विविध राज्यांमधील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांना केंद्राच्या सेवेत काही काळ काम करण्याची संधी दिली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने (ACC) दोन दिवसांपूर्वीच देशभरातील ४१ अधिकाऱ्यांची यादी प्रसिध्द केली आहे. या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारमध्ये सचिव किंवा समकक्ष पद आणि अतिरिक्त सचिव पदांसाठी पॅनेलमध्ये समाविष्ट केले आहे.
केंद्र सरकारच्या पॅनेलमध्ये महाराष्ट्रातील तीन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये १९९३ च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी सुरेंद्र कुमार बागडे यांचा समावेश करण्यात आला आहे. ते सध्या केंद्र सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स या संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. या पदावर त्यांची ऑक्टोबर २०२४ मध्ये नियुक्ती झाली आहे. बागडे यांचा समावेश सचिव किंवा समकक्ष पदाच्या पॅनेलमध्ये करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातेही आहे. राज्याच्या गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) राधिका रस्तोगी यांचाही ४१ अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. रस्तोगी या १९९५ च्या तुकडीच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी आहेत.
रस्तोगी यांचे नाव सचिव समकक्ष दर्जाच्या पदाच्या पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासोबतच १९९३ च्या तुकडीच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी मनिषा वर्मा यांना दिल्लीत जावे लागणार आहे. वर्मा या सध्या राज्याच्या कौशल्य, रोजगार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी असून त्यांना आता थेट केंद्र सरकारच्या सेवेत काम करता येणार आहे.महाराष्ट्र केडरमधील अनेक अधिकाऱ्यांनी यापूर्वीही दिल्लीत अनेक कार्यालयांमध्ये काम केले आहे. मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी हे काही वर्षे पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. महाराष्ट्रात परतल्यानंतर काही महिन्यांत सत्तांत्तर झाले आणि त्यांची फडणवीस यांच्या कार्यालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.