साहित्य आणि शिक्षण क्षेत्राचा महामेरू हरपला! माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे 91 व्या वर्षी निधन
लातूर : साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय अशा क्षेत्रांत आपला ठसा उमटवलेले ख्यातनाम साहित्यिक-विचारवंत, माजी कुलगुरू व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे (वय ९१) यांचे सोमवारी (ता.२) सकाळी येथे निधन झाले. डॉ. वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला. उस्मानिया विद्यापीठ (बीए), पुणे विद्यापीठ (एमए), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (पीएचडी) (एलएलबी) (एलएलएम), पंजाबी विद्यापीठ, पटियाला (डी. लिट) येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
डॉ. वाघमारे यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेत विपुल लेखन केले. वैचारिक लेखनाबरोबरच कादंबरी, प्रवास वर्णन, आत्मचरित्रात्मक कादंबरी, व्यक्तिचित्रण, ललित, अनुवाद असे साहित्याचे विविध प्रकार प्रभावीपणे हाताळले. डॉ. वाघमारे यांचा मूळ पिंड शिक्षणतज्ज्ञाचा होता. अध्ययन आणि अध्यापन हा त्यांनी जीवनधर्म मानला. डॉ. वाघमारे यांनी प्राध्यापक, प्राचार्य आणि त्यानंतर कुलगुरू म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे (नांदेड) ते पहिले कुलगुरू होते. वाघमारे हे इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून आपला ठसा उमटवला होता. शिक्षण साहित्याबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे विपुल योगदान होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. ३) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.