Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'बार'मध्ये मद्याचे पेग रिचवत कर्मचाऱ्याने स्वीकारली ५० हजारांची लाच; महसूल प्रशासनात खळबळ, दबा धरून बसलेल्या 'एसीबी'च्या.ताब्यात

'बार'मध्ये मद्याचे पेग रिचवत कर्मचाऱ्याने स्वीकारली ५० हजारांची लाच; महसूल प्रशासनात खळबळ, दबा धरून बसलेल्या 'एसीबी'च्या.ताब्यात 



यवतमाळ : जिल्ह्यातील प्रशासकीय केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक आणि एका वरिष्ठ लिपिकाला एका ‘बार’मध्ये ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. महसूल सहायक गोपाल महादेवराव मोहाडे (४४) व वरिष्ठ लिपिक राहुल अरुणराव कुयटे (३८) अशी आरोपी लोकसेवकांची नावे आहेत. या कारवाईने महसूल प्रशासनात खळबळ उडाली. 
तक्रारदाराची कळंब तालुक्यातील मौजा मेंढला शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीचे स्वरूप ‘भोगवटादार वर्ग-२’ असून त्यांना ते ‘भोगवटादार वर्ग-१’ मध्ये रूपांतरित करायची होती. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. ही प्रक्रिया तांत्रिक आणि कायदेशीर असल्याने महसूल विभागाची मंजुरी आवश्यक असते.
या कामाचा पाठपुरावा करताना, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक गोपाल महादेवराव मोहाडे याने या कामाच्या मोबदल्यात ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही रक्कम स्वतः न स्वीकारता त्यांनी त्यांचे जुने सहकारी आणि सध्या पांढरकवडा तहसील कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले वरिष्ठ लिपिक राहुल अरुणराव कुयटे यांच्याकडे देण्यास सांगितले.

लाचेची मागणी झाल्यामुळे तक्रारदाराने ६ मार्च रोजी यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने तातडीने तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले आणि तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. शुक्रवारी, शहरातील गजबजलेल्या स्टेट बँक चौकातील ‘फ्रेंड्स बार’ मध्ये राहुल कुयटे हा मद्याचे पेग रिचवत लाच स्वीकारण्यासाठी बसला होता. त्यावेळी सापळा रचण्यात आला.
राहुल कुयटे याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची रोकड स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेल्या गोपाल मोहाडे यालाही तातडीने ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सामान्यतः ‘वर्ग-२’ जमिनीचे रूपांतर ‘वर्ग-१’ मध्ये करण्यासाठी शासनाचे विशिष्ट नियम आणि शुल्क निर्धारित असते. मात्र, नियमानुसार काम करण्याऐवजी अशा प्रकारे खाजगी फायद्यासाठी पैशांची मागणी करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा ठरतो.
ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली. ​महसूल विभागात भ्रष्टाचारासाठी क्रमांक एकवर आहे. अशा गैरप्रकारांमुळे सामान्य नागरिकांची येथे अडवणूक होत असल्याचे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.