इराणच्या युद्धामुळे देशात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस बुकिंग करूनही तो वेळेवर मिळत नाहीये. दुसरीकडे या युद्धामुळे गॅसची किंमतही वाढली आहे. लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळावे यासाठी सरकारने आतापर्यंत आपल्या धोरणात अनेक बदल केले आहेत. पीएनजी कनेक्शन वाढवण्यावर भर दिला जात आहे. असे असतानाच आता गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आता तुम्ही गॅस सिलिंडर बुक केले तरी ते आता आणखी उशिरा मिळणार आहे.
नेमकी काय नवी माहिती समोर आली?
सुजाता शर्मा यांनी सांगितल्यानुसार देशाात गॅस सिलिंडरची कोणतीही कमतरता नाही. फक्त सध्याची स्थिती लक्षात घेता गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर ते उशिरा मिळू शकते. अगोदर गॅस सिलिंडर बुक केल्यावर तो लवकर मिळायचा. आता मात्र सिलिंडर मिळण्यास थोडा उशीर होत आहे. अगोदर दोन ते तीन दिवसांत सिलिंडर मिळायचे. आता चार ते पाच दिवस लागू शकतात. म्हणजेच तुम्हाला आता गॅस सिलिंडर आणखी दोन दिवस उशिराने मिळू शकते. गॅस सिलिंडर हवे असेल तर ओटीपी सिस्टिम अनिवार्य करण्यात आली आहे. ग्राहकांनी ओटीपी फक्त डिलिव्हरी बॉयलाच द्यावा, असे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे.
गॅस बुकिंगमध्ये 60 टक्क्यांची वाढ
सुजाता शर्मा यांच्या मतानुसार देशात गॅस सिलिंडरची कमतरता नाही. लोकांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात बुकिंग केली जात आहे. अलिकडच्या काळात बुकिंगमध्ये साधारण 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच पुरवठा साखळीवर परिणाम पडला असून गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीत उशीर होत आहे, असे सुजाता शर्मा यांनी सांगितले आहे. दरम्यान, सध्याच्या नियमानुसार तुम्ही एकदा गॅस सिलिंडर बुक केल्यास 25 दिवसांनी नवा गॅस सिलिंडर बुक करू शकता. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा 45 दिवसांची आहे. लवकरच परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.