पोलीस भरतीचा थरार! शक्तीवर्धक औषधाने घात केला; धावतानाच तरुण झाला 'वेडा'.
पुण्यात काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा पोलीस भरती दरम्यान मैदानी चाचणीत धावताना हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला. त्यानंतर आता पुण्यातील दौंड येथे पोलीस भरतीसाठी एका तरुणाने शक्तिवर्धक पेये प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे पेये घेणं तरुणाला चांगलंच महागात पडलं. हे पेय पिऊन धावताना उमेदवाराची प्रकृती बिघडली, मात्र एस आर पी एफ जवानांच्या प्रसंगावधानाने त्याचे प्राण वाचले.
पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका उमेदवाराला शॉर्टकट वापरणे चांगलेच महागात पडले आहे. दौंड मधील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानी चाचणीत जास्त गुण मिळवण्यासाठी उत्तेजित पदार्थांचे सेवन केल्यामुळे या उमेदवाराची मानसिक स्थिती बिघडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित उमेदवाराने धावण्याच्या चाचणीत वेग वाढवण्यासाठी अंमली किंवा उत्तेजित पदार्थाचे सेवन केले होते. मात्र,धाव पूर्ण केल्यानंतर काही वेळातच या पदार्थाचा त्याच्या शरीरावर आणि थेट मेंदूवर विपरीत परिणाम झाला. तो उमेदवार भरती प्रक्रियेदरम्यान विचित्र वर्तन करू लागला आणि त्याने मैदानात मोठा गोंधळ घातला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिथे तैनात असलेल्या एस आर पी एफच्या जवानांनी तत्काळ धाव घेतली. त्या उमेदवाराला वेळीच आवर घालून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या उपचारानंतर सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते, मात्र या घटनेने भरती प्रक्रियेत खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.