मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकांचे वारे अद्याप शमले नसतानाच, आता विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापवले आहे. आगामी 13 मे 2026 रोजी विधान परिषदेतील नऊ सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपत असून, या रिक्त होणाऱ्या जागांसाठी पडद्यामागे जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. सध्याच्या विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता, भाजप सहज पाच उमेदवार निवडून आणू शकते. मात्र, पक्षात इच्छुकांची यादी खूप मोठी आहे. विशेषतः नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी आता विधान परिषदेसाठी जोर लावला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपमधून केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांसारखी प्रमुख नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे, भाजपचे सध्याचे चार आमदार निवृत्त होत आहेत, ज्यात रणजीतसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांचा समावेश आहे. पक्ष जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देतो की नवीन चेहऱ्यांना वाव देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी आवश्यक असणारा 28 मतांचा कोटा लक्षात घेता, महायुती सहजपणे आपले आठ उमेदवार निवडून आणू शकते. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल.
महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येणार असल्याने, ती जागा उद्धव ठाकरेंसाठी सोडली जाणार का? ठाकरे गटाचे 20 आमदार असल्याने त्यांचा या जागेवर पहिला दावा आहे, मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काय भूमिका घेते, यावर बरेच काही अवलंबून असेल. एप्रिल महिन्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने गुप्त हालचालींना वेग येईल. भाजपमधील अंतर्गत स्पर्धा आणि महायुतीतील जागावाटप यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.