Big Breaking! इबोलाचा नवा विळखा! १३१ जणांचा मृत्यू, लस उपलब्ध नसल्याने चिंता; अमेरिकेकडून व्हिसा सेवा बंद, जर्मनी हाय-अलर्टवर!
या धोकादायक उद्रेकामुळे कांगोमध्ये आतापर्यंत किमान 131 जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन WHO ने याला "आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी" घोषित केले असून या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
या प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे यावेळी इबोलाचा 'बुंदीबुग्यो' (Bundibugyo) स्ट्रेन पसरत आहे. या स्ट्रेनसाठी सध्या कोणतीही अधिकृत लस किंवा अचूक उपचार उपलब्ध नाहीत. सामान्यतः इबोलाच्या 'जायरे' स्ट्रेनसाठी लसी उपलब्ध असतात, मात्र या नव्या स्ट्रेनमुळे डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
कांगोचे आरोग्यमंत्री सॅम्युअल रोजर काम्बा यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीवर सांगितले की, देशात आतापर्यंत सुमारे 513 संशयित रुग्ण आढळले आहेत आणि हा आकडा सातत्याने वाढत आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती (ICRC) नेही गंभीर इशारा दिला आहे. युद्धग्रस्त भागांमध्ये सक्रिय असलेल्या सशस्त्र गटांनी डॉक्टर आणि मदत पथकांना सुरक्षित मार्ग दिला नाही. तर या महामारीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होईल, असे संस्थेने म्हटले आहे.
कांगोतील या परिस्थितीचा परिणाम आता युरोप आणि अमेरिकेपर्यंत पोहोचू लागला आहे. Germany ने मंगळवारी जाहीर केले की कांगोमध्ये संक्रमित झालेल्या एका अमेरिकन नागरिकाच्या उपचारांसाठी त्यांनी तयारी पूर्ण केली आहे. अमेरिकन ख्रिश्चन स्वयंसेवी संस्था Serge ने पुष्टी केली की संक्रमित व्यक्ती त्यांच्याच संस्थेतील डॉक्टर असून कांगोमध्ये रुग्णांवर उपचार करताना त्याला विषाणूची लागण झाली.या घटनेनंतर अमेरिकेने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. इबोला प्रभावित आफ्रिकन देशांतून येणाऱ्या विमान प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच त्या देशांसाठी व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना कांगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे प्रवास टाळण्याचा कडक सल्लाही दिला आहे.गेल्या 50 वर्षांत इबोला विषाणूमुळे आफ्रिकेत 15 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कांगोच्या इतिहासातील हा इबोलाचा 17वा मोठा उद्रेक आहे. यापूर्वी 2018 ते 2020 दरम्यान कांगोमध्ये झालेल्या सर्वात भीषण इबोला साथीमध्ये सुमारे 2,300 जणांचा मृत्यू झाला होता.
'बुंदीबुग्यो' स्ट्रेनचा इतिहास पाहिला तर 2007 मध्ये युगांडा आणि 2012 मध्ये कांगोमध्ये याच स्ट्रेनने मोठ्या प्रमाणावर कहर माजवला होता. त्या काळात मृत्यूदर 30 ते 50 टक्क्यांपर्यंत नोंदवला गेला होता. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रने(Africa CDC) ही या उद्रेकाला संपूर्ण आफ्रिका खंडासाठी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.