आजच्या वाढत्या महागाईच्या काळात भविष्यासाठी पैशाची बचत करणे खूपच गरजेचं बनले आहे. अनेकांना कमी उत्पन्नामुळे मोठी बचत करणे शक्य होत नाही. गुंतवणूक कशात करावी हा सुद्धा प्रश्न असतो. काहीजण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात, काही जण बँकेत, तर काही लोक SIP च्या माध्यमातून पैशाची गुंतवणूक करत असतात. मात्र सध्या शेअर बाजारातील चढ उतार बघता अजूनही अनेकजण पोस्ट ऑफिसवरच विश्वास ठेवतात. पोस्ट ऑफिस सुद्धा अनेक योजना राबवत असते ज्यामुळे कमी गुंतवणुकीतून सुद्धा मोठा आर्थिक फंड जमा करता येतो.आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगतो, ज्यामध्ये रोज ५० रुपयांची बचत तुम्हाला ३५ लाख रुपये कमवण्याची संधी देते. या गुंतवणुकीसोबतच विमा संरक्षणाचाही लाभ मिळतो.
ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना. ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) अंतर्गत चालवली जाणारी ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष फायदेशीर मानली जाते. या योजनेत कमी प्रीमियममध्ये आयुष्यभर विमा संरक्षणासोबत चांगला परतावाही मिळू शकतो.
या योजनेत किमान १०,००० रुपये आणि कमाल १० लाखांपर्यंत विमा संरक्षण घेता येते. १९ ते ५५ वर्षे वयोगटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, नियमित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे मोठी रक्कम जमा करता येते.उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने १९ व्या वर्षी १० लाखांची विमा रक्कम निवडली आणि ६० वर्षांपर्यंत प्रीमियम भरला, तर त्याला सरकारी बोनसचाही लाभ मिळतो. सध्या या योजनेवर प्रति १,००० रुपयांच्या विमा रकमेवर दरवर्षी ६० रुपयांचा बोनस दिला जातो. त्यामुळे ४१ वर्षांच्या कालावधीत बोनसची रक्कमच सुमारे २४.६० लाखांपर्यंत पोहोचू शकते.अशा परिस्थितीत, १० लाखांची मूळ विमा रक्कम आणि बोनस मिळून मुदतपूर्तीनंतर एकूण रक्कम सुमारे ₹३४.६० लाख, म्हणजेच जवळपास ₹३५ लाखांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे कमी गुंतवणुकीत मोठा निधी तयार करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज भरावा लागतो. अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे फोटो सादर करावे लागतात. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन बचत, विमा संरक्षण आणि सरकारी हमी या तिन्ही गोष्टी एकाच योजनेत मिळत असल्याने ही योजना ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.