राजधानी दिल्लीतील मालवीय नगर भागातील एका सहा मजली हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतके परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या दुर्घटनेत १० पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीची भीषणता एवढी मोठी होती की, काही क्षणात संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दरम्यान, रेस्टॉरंटच्या मुख्य शेफने दिलेल्या माहितीने आगीचे मुख्य कारण समोर आणले आहे.
इलेक्ट्रिक शेगडीचा धमाका झाला अन्... शेफ केसर नेगी यांनी सांगितला थरार
या इमारतीच्या तळमजल्यावर एक रेस्टॉरंट चालवले जात होते. या रेस्टॉरंटचे मुख्य शेफ केसर सिंग नेगी यांनी सांगितले की काही मिटिनांमध्ये आगीने संपूर्ण इमारतीला घेरले होते. "सकाळी ८ वाजता मी रेस्टॉरंटमधील इलेक्ट्रिक शेगडी चालू करण्याचा प्रयत्न केला. ती शेगडी थोडी गरम होती. मी शेजारी उभा राहून चहा पीत होतो. त्यानंतर जोरात स्फोट झाल्यासारखा आवाज आला. मी बटण दाबले आणि अचानक एकामागून एक मोठे स्फोट झाले. आग भडकल्यामुळे मी विजेचा स्विच बंद केला आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत आग पसरली होती. आग इतकी वेगाने भडकली की काही समजण्याच्या आत संपूर्ण रेस्टॉरंट धूर आणि आगीने वेढले गेले. मी लगेच माझ्या असिस्टंटला ओरडून सांगितले की हॉटेलला आग लागली आहे आणि आम्ही जीव वाचवून बाहेर पळालो. मी बाहेर येऊन पाहिले तर संपूर्ण हॉटेल जळत होते. आधी हॉटेलमध्ये आग लागली आणि त्यानंतर ती पसरत गेली," असं शेफने सांगितले.
इलेक्ट्रॉनिक गेट लॉक झाले अन् लोक अडकले
एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, आग लागताच हॉटेलची वीज खंडित झाली. सर्वात मोठी चूक म्हणजे हॉटेलचा मुख्य दरवाजा हा इलेक्ट्रॉनिक होता. लाईट गेल्यामुळे तो गेट जागच्या जागी लॉक झाला आणि आत अडकलेल्या पर्यटकांना बाहेर पडण्याचा मुख्य रस्ताच बंद झाला. इमारतीमध्ये अडकलेले लोक खिडक्यांमधून मदतीसाठी ओरडत होते. स्थानिक लोकांनी धाडस दाखवून इमारतीचे काचेचे दरवाजे आणि खिडक्या तोडण्यास सुरुवात केली.जीव वाचवण्यासाठी काही लोकांनी थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या. उड्या मारणाऱ्यांचा जीव स्थानिक लोकांनी आसपासच्या हॉटेल्समधून गाद्या आणून खाली जमिनीवर अंथरल्या. एका महिलेने दोरीच्या सहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र हात निसटल्याने ती खाली गाद्यांवर पडली आणि तिचा जीव वाचला.हे हॉटेल दिल्लीच्या प्रेस एन्क्लेव रोडवर आहे, जिथे प्रसिद्ध मॅक्स हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल जवळच आहेत. या रुग्णालयांमध्ये देशा-परदेशातून जे रुग्ण उपचारासाठी यायचे, त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक प्रामुख्याने या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबायचे. त्यामुळेच मृतांमध्ये परदेशी नागरिकांची संख्या जास्त आहे.
१० पोलिसांसह १३ जण जखमी
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी ८:४८ वाजता आगीचा कॉल मिळाला होता. अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मदतकार्यादरम्यान तब्बल १० पोलीस कर्मचारीही आगीत होरपळले आणि जखमी झाले. सर्व १३ जखमींना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त; आर्थिक मदतीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. केंद्र सरकारकडून या दुर्घटनेत जीव गमावलेल्या मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २-२ लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना ५०-५० हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.