कन्नड: नागरिकांच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाने मुंगसापूर येथील आश्रमावर बुधवारी (ता. २४) छापा मारला. रुग्णांचे नाव, आजार आणि घेतलेले शुल्क यांची नोंद असलेली ५ महत्त्वाची रजिस्टर्स जप्त केली.
मुंगसापूर येथील मुकुंद शंकर पाटील ऊर्फ महामंडळेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी महाराज यांच्या या आश्रमात परवान्याशिवाय औषध उत्पादन आणि विक्री केली जात असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती. बुधवारी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) व्ही. व्ही. नागरे, अधिकारी एम. बी. पाटणे, कन्नडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळुंके, सहायक प्रशासन अधिकारी हरिनाम कोल्लमवार आणि पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सुशीला बाबुल, डॉ. प्रदीप कांबळे यांच्या पथकाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष आश्रमात प्रवेश केला. जप्त केलेली रजिस्टर्स तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली.
'हर्बल' औषधाची बाटली जप्त
आश्रमाच्या मॅनेजरने दावा केला की, चार महिन्यांपूर्वीच सर्व औषधे केरळमधील एका कंपनीला परत पाठवली आहेत. मात्र, याबाबत त्याने कागदपत्रे सादर केली नाहीत. दुसऱ्या मजल्यावरील तपासणीत पथकाला 'महामंडळेश्वर हर्बल एसएस प्योर हर्बल' (एमआरपी ३००) अशी छापील लेबल असलेली आणि उत्पादनाचा पत्ता "ब्रह्मर्षी जनार्दन स्वामी आश्रम, मुंगसापूर" अशी नोंद असलेली एक बाटली मिळून आली.
पोलिसांना बोलावून तोडले कुलूप
आश्रमात सर्वप्रथम रवींद्र गोडसे हा आढळून आला. तो येथे गोशाळा व पूजेचे काम पाहत असल्याचे समोर आले. आश्रमाच्या तीन मजली मुख्य इमारतीच्या खोल्यांना कुलूप असल्याने मॅनेजर संजय फोलाणे याला बोलावून घेण्यात आले. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या गेटला कुलूप होते. मॅनेजरने चावी देण्यास नकार दिल्याने कन्नड ग्रामीण पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक एन. बी. गिते व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कुलूप तोडण्यात आले.
महाराज सीए, पण 'वैद्यकीय' नाही
आश्रमाचे प्रमुख मुकुंद शंकर पाटील ऊर्फ मुक्तानंदगिरी महाराज यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत मॅनेजरकडे विचारणा केली असता, महाराजांचे 'सीए'चे शिक्षण झाले असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कोणतीही पदवी किंवा कागदपत्रे आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले. महाराज २८ दिवसांपूर्वी तपश्चर्येसाठी हिमालयात गेले असून त्यांच्याकडे मोबाइल नसल्याचे मॅनेजरने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.