FDA च्या 'अतिउत्साही' कारवाईने वर्ध्यात खळबळ; 'गोरस भंडार' ठप्प, हजारो दूध उत्पादक संकटाच्या गर्तेत!
वर्धा: स्वातंत्र्यपूर्व काळापासून गांधीजीच्या विचारधारेवर चालणारी आणि वर्धा शहराची सांस्कृतिक व सामाजिक ओळख असलेली 'गोरस भंडार' ही संस्था सध्या संकटात सापडली आहे. अन व औषध प्रशासनाने रविवारी (ता.३१) अचानक केलेल्या कारवाईनंतर संस्थेला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या एका कारवाईमुळे दूध उत्पादकांसह ग्राहकांसमोर पेच निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील अंदाजे ६०० दूध उत्पादक या संस्थेला दूध विकून आपला उदरनिर्वाह करतात. संस्थेमार्फत दररोज नऊ हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. जे आता पूर्णपणे थांबले आहे. संस्थेकडून प्रतिलिटर ४२ रुपये या भावाने दूध खरेदी करण्यात येत होती. याशिवाय शहरात गोरस भंडारची ११ केंद्रे असून पाच हजारांहून अधिक ग्राहकांना ३३ वितरकांच्या माध्यमातून दररोज घरपोच दूध दिले जात होते. हे वितरणही आता ठप्प झाले आहे. या कारवाईमुळे संस्थेवर अवलंबून असलेली संपूर्ण साखळीच विस्कळीत झाली आहे.
एफडीएच्या हेतूवर प्रश्नचिन्ह
या कारवाईमुळे वर्धेकरांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. शहरातील इतर बड़े स्वीट मार्ट आणि खासगी डेअरींच्या तपासणीकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने केवळ गोरस भंडारवर कारवाई करून स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे, असा संतप्त सूर उमटत आहे. एका ऐतिहासिक आणि शेतकऱ्यांचा आधार असलेल्या संस्थेला अवानक कुलूप लावल्याने गावखेड्यातील दूध उत्पादक चिंतेत सापडला आहे.दुधजन्य पदार्थांच्या नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच एफडीएने संस्थेला उत्पादन बंदचे आदेश देण्यात आल्याने दूध उत्पादक शेतकरी, संस्थेतील कर्मचारी आणि वर्षेकर नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तसेच मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एफडीएच्या या निर्णयानंतर गोरस भंडारचे दररोज साडेतीन ते पावगेचार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. गोरस भंडारचा 'गोरस पाक' हा पदार्थ जगप्रसिद्ध आहे. या चविष्ट आणि शुद्ध पदार्थाला देशातच नव्हे तर विदेशातूनही मोठी मागणी असते. वर्ध्याच्या अस्मितेशी जोडला गेलेला हा ब्रेड आता शासकीय कारवाईच्या कचाट्यात सापडला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.