ठाणे शहर: रुग्णांची अडवणूक करून आर्थिक लूट करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने रुग्णवाहिकांना ठरवून दिलेले दरपत्रक दर्शनीय भागात लावणे बंधनकारक असून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले.
खासगी रुग्णवाहिका सेवेत पारदर्शकता येणे आवश्यक आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत खासगी रुग्णवाहिका मालकांकडून मनमानी दर आकारणी केली जाते. ही बाब 'सकाळ'ने उघडकीस आणली होती. त्यानंतर काही राजकीय पक्षांनी रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक लावण्याची मागणी केली होती.परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील या फसवणुकीची दखल घेत राज्यभरातील रुग्णवाहिकांसाठी दरपत्रक निश्चित करून ते प्रत्येक खासगी रुग्णवाहिकेमध्ये ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले. त्यामुळे अवाजवी दर आकारण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.
ठाणे प्रादेशिक विभाग आणि ठाणे जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिकाचालक-मालकांना शासनाने निश्चित केलेल्या अधिकृत दरपत्रकाचे वितरण करण्यात आले. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, जिल्हा दंतचिकित्सक डॉ. अर्चना पवार, मनसे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे, नैनेश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दर असे (रुपयांत)
वाहन प्रकार - मारुती व्हॅन रुग्णवाहिका२५ किमी किंवा २ तासांपर्यंत - ७००त्यानंतर प्रतिकिमी - १४वाहन प्रकार - टाटा सुमो/मटेडोर२५ किमी किंवा २ तासांपर्यंत - ८४०त्यानंतर प्रतिकिमी - १४वाहन प्रकार - टाटा ४०७ किंवा स्वराज माजदा इ.२५ किमी किंवा २ तासांपर्यंत - ९८०त्यानंतर प्रतिकिमी - २०वाहन प्रकार - आयसीयू किंवा वातानुकूलित वाहने२५ किमी किंवा २ तासांपर्यंत - १,१९०
त्यानंतर प्रतिकिमी - २४
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिकांसाठी शासकीय दरपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे रुग्णवाहिका सेवेत पारदर्शकता वाढेल. शासकीय दरपत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सर्व रुग्णवाहिकाचालक व मालकांना करण्यात येत आहे.
- हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.