काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या एका कोचची हनिमूनसाठी सजावट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणात संबंधित टीसीवर कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा रेल्वेतील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये धावत्या रेल्वेत पूजा-अर्चा सुरू असल्याचे दिसत असून, त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. रेल्वेत अशा प्रकारचे धार्मिक विधी करण्यास परवानगी असते का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती खाली बसून पूजा करताना दिसत आहे, तर त्याचे सहकारी मंत्रोच्चार करत आहेत. या धार्मिक विधीत काही भाविकही सहभागी झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यासाठी रेल्वेची परवानगी घेण्यात आली होती का, असल्यास त्याची प्रक्रिया काय असते, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
व्हिडीओची चर्चा वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनानेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेच्या माहितीनुसार, हा धार्मिक विधी कोणत्याही सामान्य प्रवासी डब्यात नव्हे, तर खासगीरित्या आरक्षित करण्यात आलेल्या 'सलून कार'मध्ये पार पडला. हा डबा आयआरसीटीसीच्या (IRCTC) व्यावसायिक बुकिंग प्रक्रियेद्वारे एका खासगी समूहाने आरक्षित केला होता.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या सलून कारचे बुकिंग ८ जुलै रोजी करण्यात आले होते. संबंधित व्यक्तीने बुकिंगसाठी तीन लाख रुपयांहून अधिक आगाऊ रक्कम भरली होती. ही सलून कार १० जुलै रोजी नवी दिल्ली-मुंबई पश्चिम एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२९२६) ला जोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.दरम्यान, रेल्वेतील 'सलून कार' हा विशेष प्रकारचा आलिशान डबा असून, तो प्रामुख्याने वरिष्ठ अधिकारी, व्हीआयपी किंवा खासगी बुकिंगसाठी उपलब्ध करून दिला जातो. या डब्यात वातानुकूलित शयनकक्ष, दिवाणखाना, भोजन कक्ष, स्वयंपाकघर तसेच संलग्न स्नानगृह आणि प्रसाधनगृह अशा आधुनिक सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे अशा सलून कारचा वापर सामान्य प्रवासी डब्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या नियमांनुसार केला जातो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.