पालकांनो सावध व्हा! स्नॅक्समधील 'त्या' फ्री गिफ्टने केला घात; 5 वर्षांच्या चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू
बंगळुरू: स्नॅक्सच्या पाकिटात मिळालेलं प्लास्टिकचं खेळणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलं आहे. कुरकुरेच्या पाकिटात चेंडू खेळता खेळता चिमुकल्याच्या घशात जाऊन अडकला. त्यामुळे त्याला श्वास घेताना अडचण येऊ लागली.
श्वास कोंडला गेल्यानं त्याचा तडफडून शेवट झाला. चिमुकल्याच्या अकाली मृत्यूनं त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही दुर्दैवी घटना कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यात घडली.
मुकुंद मयूर असं मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे आजोबा ग्राम पंचायतीचे उपसरपंच आहेत. शनिवारी संध्याकाळी मुकुंद घरी रडू लागला. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला जवळच्या दुकानातून स्नॅक्सचं पाकिट आणून दिलं. स्नॅक्स खाल्ल्यानंतर मुकुंदला श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याचे आई-वडील, कुटुंबीय घाबरले. त्यांनी मुकुंदला तातडीनं रुग्णालयात नेलं. पण रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
स्नॅक्सच्या पाकिटासोबत प्लास्टिकच्या चेंडू मोफत मिळाला होता. स्नॅक्ससोबत मिळालेलं हेच गिफ्ट मुकुंदच्या मृत्यूस कारण ठरलं. चेंडू घशात अडकल्यानं मुकुंदला श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यानं अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. एकुलता एक लेक गेल्यानं मुकुंदच्या पालकांनी आक्रोश केला. मुकुंदच्या मृत्यूनंतर त्याच्या आईनं आक्रोश केला. लेकाचं नाव घेऊन तिनं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मृत लेक प्रतिसाद देत नसल्याचं पाहून तिनं टाहो फोडला. तेव्हा उपस्थित हेलावले. अनेकांचे डोळे पाणावले. ५ वर्षांचा मुकुंद गावात प्रसिद्ध होता. त्याच्या अकाली निधनानं गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिकचा चेंडू कुरकुरेच्या पाकिटातच होता. तो मोफत देण्यात आला होता. खेळता खेळता मुकुंदनं तो तोंडात टाकला. हा चेंडू मुकुंदच्या घशात अडकला. त्याचा श्वास कोंडला गेला. त्याची प्रकृती वेगानं खालावली. कुटुंबियांनी त्याला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या प्रकरणी मुकुंदच्या कुटुंबियांनी अद्याप तरी पोलिसात लेखी तक्रार दाखल केलेली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.