🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अजिंक्यन वुमन फाउंडेशनतर्फे रक्षाबंधनाचा उत्साह; कैद्यांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक संदेश​

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अजिंक्यन वुमन फाउंडेशनतर्फे रक्षाबंधनाचा उत्साह; कैद्यांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक संदेश


सांगली :- अजिंक्यन वुमन फाउंडेशन व विविध सामाजिक संस्थांच्या सहयोगाने सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात, आपुलकीच्या आणि भावूक वातावरणात साजरा करण्यात आला. समाजात सकारात्मकता रुजवण्यासाठी आणि कर्तव्यावर तैनात असलेल्या रक्षकांचा सन्मान करण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रात्रंदिवस कडक बंदोबस्तात सेवा बजावणाऱ्या कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्ठापूर्वक सेवेचे कौतुक करत फाउंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. यासोबतच, कारागृहातील बंदीजनांच्या (कैद्यांच्या) आयुष्यात सुधारणेची नवी पहाट व्हावी, त्यांच्या मनात सकारात्मक विचार रुजावेत आणि शिक्षेचा काळ संपल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्य समाजप्रवाहात सन्मानाने सामील व्हावे, या उदात्त उद्देशाने त्यांनाही राखी बांधून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या भावूक प्रसंगी अजिंक्यन वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजिरी गाडगीळ, शुभांगी साळुंखे, ज्योती सर्वदे, चित्रा पंडीयान, स्मिता घेवारे, स्वाती भिडे, वैशाली कुलकर्णी, अपर्णा पोतदार यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच कारागृहाचे अधीक्षक विजय कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अरुण मदने आणि कारागृहाचा सर्व कर्मचारी वर्ग या उपक्रमात सहभागी झाला होता. ​सामाजिक बांधिलकी आणि आपुलकी जपणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगत, कारागृह अधीक्षक विजय कांबळे यांनी कारागृह प्रशासनाच्या वतीने अजिंक्यन वुमन फाउंडेशन व सर्व सहभागी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.