🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिप्लाला पुण्यात मोठा दणका! औषध विक्रीचा परवाना रद्द; तुकाराम मुंढेंचा कडक कारवाईचा बडगा

सिप्लाला पुण्यात मोठा दणका! औषध विक्रीचा परवाना रद्द; तुकाराम मुंढेंचा कडक कारवाईचा बडगा


पुणे : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने पुण्यातील वडकी येथील 'सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्स लिमिटेड' या कंपनीच्या 'कॅरी अँड फॉरवर्डिंग' गोदामावर मोठी कारवाई करत त्यांचे औषध विक्री परवाने 27 ऑगस्ट 2026 पासून रद्द केले आहेत. 

जून 2026 मध्ये एफडीएने या गोदामाची पाहणी केली असता, ‘रेक्टिन प्लस टॅबलेट’ या ‘शेड्युल एच’ श्रेणीतील औषधाच्या वेष्टनावर नियमबाह्य जाहिरात आढळली होती. औषधावर ‘अनालजेसिक व ॲंटीपायरेटीक’ असा अयोग्य उल्लेख करून जाहिरातबाजी करण्यात आली होती. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच औषधे घेण्याच्या गैरप्रकाराला खतपाणी मिळून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकत होता. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 आणि नियम 1945 चे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने 11.19 लाख रुपयांचा साठा जप्त केला होता. 

हे औषध ‘मिसब्रँडेड’ ठरल्यामुळे प्रशासनाने ते बाजारातून त्वरित परत मागवण्याचे निर्देश सिप्ला फार्म्याला दिले होते. परंतु, कंपनीने या निर्देशांचे योग्य पालन केले नाही.आता कंपनीच्या तपासणीत संगणकातील नोंद आणि प्रत्यक्ष गोदामातील औषध साठ्यात मोठी तफावत दिसून आली.औषधे जमिनीवर ठेवणे आणि साठवणुकीसाठी पुरेशा रॅकची सोय नसणे.मुदतबाह्य औषधांच्या व्यवस्थापनाचे आणि नोंदींचे अपुरे काम.खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आणि रिकॉल निर्देशांची पायमल्ली या त्रुटी दिसून आल्या.

या गंभीर गैरसोयींनंतर प्रशासनाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, कंपनीने दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक आढळल्याने एफडीएने अखेर कठोर पाऊल उचलत 27 ऑगस्ट 2026 पासून सिप्ला फार्माचा परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. औषधांचा दर्जा आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी प्रशासनाकडून अशी कठोर पावले उचलली जात आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.