नागपूर: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, खाते बदल होणार असल्याच्या चर्चांनी मागील काही दिवसात चांगलाच जोर पकडला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची चर्चा सुरू असताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे आयोजित 'एकलव्य एकल विद्यालय शिक्षक - पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग' कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत सूचक विधान केले आहे.
नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटमधील ज्येष्ठ मंत्री आहेत.गडकरी हे २०१४ पासून मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. देशभरात एक्स्प्रेसवेच्या कामामुळे गडकरी चांगलेच चर्चेत आले. मात्र, मागील काही महिन्यांपासून गडकरी यांच्याबाबत रोष वाढत असल्याचे म्हटले जात आहे. गडकरी यांनी सातत्याने इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे समर्थन केले.इथेनॉलच्या वापराबाबत गडकरी आग्रही आहेत. तर, दुसरीकडे इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहने खराब होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून सुरू झाला आहे. तर, विरोधकांनी देखील या मुद्यांवरून गडकरी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता गडकरी यांच्या वक्तव्याने आता नव्याने चर्चांना उधाण आले आहे.
नितीन गडकरी यांनी काय म्हटले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, "मी गेल्या ३० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात सतत काम करत आहे. अनेक चढउतार पाहिले, अनेक पुरस्कारही मिळाले. पण आता मी जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला काम करण्याची संधी दिली पाहिजे," असे वक्तव्य गडकरी यांनी केले. आता, गडकरी यांनी नवीन पिढीला संधी दिली पाहिजे असे म्हटल्याने त्यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
तर, सत्ता काय कामाची?
आपल्या दिनचर्येतील बदलांवर बोलताना ते पुढे म्हणाले, "पूर्वी पक्षाचे काम करताना अगदी समोसे खाऊन कुठंही झोपत होतो. मात्र कोरोनाच्या काळानंतर मी शिस्तीत आलो असून आता दररोज न चुकता योगा करतो. तब्बेतच चांगली नसेल तर सत्ता आणि पद काही कामाचे नाही," अशा शब्दांत त्यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर चिंता व्यक्त करत उर्वरित काळात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोठे काम करण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.