सांगली :- मिरज तालुक्यातील पाटगाव येथे जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मिरज ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत डाकोबा खिंड परिसरातून जेरबंद केले. न्यायालयाने आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली राजेश पाटील (वय २७, रा. पाटगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुशांत सुरेश पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
घटनेची पार्श्वभूमी व कारवाईचा थरार
८ ऑगस्ट रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास डोंगरवाडी येथील बैलगाडी शर्यतीवरून परतताना आणि करोली (एम) येथील जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी माऊली पाटील यांच्यावर धारदार कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच (गु.र.नं. ४१९/२०२६) पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या आधारे तपास सुरू केला. अंमलदार सुनील जाधव, संकेत मगदूम, अतुल माने, इम्रान मुल्ला व सुशील मस्के यांना आरोपी गडदोबा डोंगराजवळ डाकोबा खिंड परिसरात लपल्याची पक्की बातमी मिळाली. पथकाने तत्काळ सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
अक्षय पांडुरंग माने (वय ३०, रा. योगेवाडी, ता. तासगाव)सर्वेश सूर्यकांत देशमुख (वय १९, रा. करोली एम, ता. मिरज)विक्की ऊर्फ धनराज मधुसूदन पवार (वय २३, रा. करोली एम, ता. मिरज) पोलीस कस्टडी सुनावलीतपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपासासाठी त्यांना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ पुढील तपास करत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.