🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासगी गाड्यांवर 'पोलीस' लिहिलंय का? तर मग बसणार मोठा दणका; वाहतूक विभागाचे कठोर कारवाईचे आदेश

खासगी गाड्यांवर 'पोलीस' लिहिलंय का? तर मग बसणार मोठा दणका; वाहतूक विभागाचे कठोर कारवाईचे आदेश


पुणे: खासगी वाहनांवर 'पोलीस' असे लिहिणे किंवा लाल रंगाची 'पोलीस' पाटी लावून वाहन चालवणाऱ्यांविरोधात राज्यात लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असा लाल रंगातील उल्लेख किंवा पाटी लावून वाहनांचा वापर करतात. अशा वाहनांची तपासणी अनेकदा टाळली जाते. याचाच गैरफायदा घेत काही जण अवैध वस्तूंची वाहतूक किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी अशा वाहनांचा वापर करत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.
या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानेही खासगी वाहनांवर 'पोलीस' असा उल्लेख करण्याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर वाहतूक विभागाने यासंदर्भातील पत्र राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले आहे. 

पत्रात नमूद केल्यानुसार, मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे हा विषय पुढे आला. 'पोलीस' अशी पाटी असल्यामुळे संबंधित वाहनांची तपासणी होत नसल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा वाहनांवर निर्बंध आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

यानुसार, खासगी वाहनांवर 'पोलीस' असा उल्लेख किंवा पाटी आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 133(6) तसेच मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 177 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे पुढील काळात खासगी वाहनांवर 'पोलीस' अशी पाटी लावून फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता असून, अशा वाहनांची तपासणी अधिक काटेकोरपणे केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.