अमरावती रुग्णालय अग्निकांड : आरोग्य मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी
चंद्रपूर: अमरावती येथील शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेवरून काँग्रेस नेते तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली. रुग्णालयाचे योग्य पद्धतीने ऑडिट झालेले नाही.
राज्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेची अवस्था गंभीर असून, 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? खड्ड्यात नेऊन ठेवला महाराष्ट्र,' अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आणि सरकारवर हल्लाबोल करतांना आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
अमरावती तसेच राज्यातील इतरही शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे, आवश्यक औषधांचा तुटवडा आहे आणि आरोग्य व्यवस्थेतील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णालयांचे नियमित ऑडिट आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी होणे आवश्यक असतानाही अमरावती रुग्णालयाचे ऑडिट झाले नसल्याचा दावा त्यांनी केला.
'आरोग्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा'
अमरावती प्रकरणात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्यमंत्र्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. 'साप चावल्याच्या घटनेत शाळेच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला जातो; मग रुग्णालयातील दुर्घटनेला जबाबदार असलेल्या आरोग्यमंत्री आणि खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळेत झाल्या पाहिजेत. अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्था, प्रशिक्षित कर्मचारी, डॉक्टर आणि औषधांची उपलब्धता याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले.
आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट, अग्निशमन यंत्रणांची कार्यक्षमता आणि आपत्कालीन परिस्थितीतील तयारी यांची नियमित तपासणी न झाल्यास गंभीर दुर्घटनांचा धोका कायम राहतो. अमरावतीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करावे, त्रुटी आढळल्यास त्या त्वरित दूर कराव्यात आणि दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.