सांगलीत एलसीबीची धडक कारवाई: ४ किलो गांजासह ५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; रेकॉर्डवरील आरोपी सचिन चव्हाण गजाआड
सांगली जिल्ह्यातील अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहीमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने सापळा रचून कवठेपिरान फाट्या जवळ हुंदाई आय-२० कारमधून गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ४ किलो १६३ ग्रॅम गांजा आणि कार असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सचिन दादासो चव्हाण (वय ३५, रा. गांधीनगर, मराठी शाळेजवळ, कवठेपिरान, ता. मिरज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महालक्ष्मी मंदिराशेजारी लावला सापळा
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे कडक आदेश एलसीबीला दिले होते. यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व पथक गस्तीवर होते.
यादरम्यान पोलीस अंमलदार अनिल कोळेकर व विक्रम खोत यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन चव्हाण हा हुंदाई आय-२० कारमधून (राखाडी रंग) गांजा विक्रीसाठी लक्ष्मी फाटा ते कवठेपिरान रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात येणार आहे.
मिळालेल्या बातमीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने महालक्ष्मी मंदिर परिसरात तातडीने सापळा रचला. काही वेळातच एक संशयित कार रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता कारला वेढा घातला आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सचिन चव्हाण याला ताब्यात घेतले.
कारच्या डिग्गीत सापडला गांजा
पंचांच्या समक्ष कारची आणि आरोपीची झडती घेतली असता, कारच्या डिग्गीमध्ये प्लॅस्टिकच्या पांढऱ्या पिशवीत १ लाख ८० हजार रुपये किमतीचा ४ किलो १६३ ग्रॅम वजनाचा हिरवट, काळपट रंगाचा फुलबोंडे असलेला तयार गांजा मिळून आला.
पोलीस पथकाने सुरुवातीला चौकशी केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी हिसका दाखवताच, त्याने हा गांजा जास्त दराने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी १ लाख ८० हजारांचा गांजा आणि ४ लाख रुपये किमतीची हुंदाई आय-२० कार असा एकूण ५,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
अटक करण्यात आलेला आरोपी सचिन चव्हाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे आणि एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी एलसीबीचे पोहेकॉ नागेश खरात यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख, सपोनि प्रशांत निशाणदार, पोउपनि महादेव पोवार तसेच एलसीबीचे अंमलदार अनिल कोळेकर, विक्रम खोत, अतुल माने, नागेश खरात, सतिश माने, संदीप गुरव, सागर लवटे, संदीप नलावडे, मच्छिंद्र बर्डे, मोतीराम खोत, सागर टिंगरे, दरीबा बंडगर, अमर नरळे, उदय माळी, अमीर फकीर, केरुबा चव्हाण, सांगली ग्रामीण ठाण्याचे मेघराज रुपनर, अरुण औताडे, बंडु पवार आणि सायबर पोलीस ठाण्याचे सतिश अलदर यांच्या पथकाने केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.