गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘बंगळुरूला स्थायिक झालेले आमदार परत जात नाहीत, अशा अनेक आमदारांनी दोन विवाह केले आहेत, अशी डझनभर उदाहरणं आहेत’, असं वक्तव्य डी.के.शिवकुमार यांनी केलं आहे.
डी.के.शिवकुमार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कर्नाटकात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच त्या आमदारांची नावं जाहीर करण्याचं आव्हान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी डी.के.शिवकुमार यांना दिलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
डी.के.शिवकुमार यांनी काय म्हटलं?
“बंगळुरूला स्थायिक झालेल्या आमदारांची पार्श्वभूमी मला माहिती आहे. बंगळुरूला आलेले आमदार परत जात नाहीत. जे कोणी या शहरात येतात, ते कधीच परत जात नाहीत. अगदी बाहेरून येणारे आमदारही इथे स्थायिक होतात. बाहेरून आलेल्या अशा अनेक आमदारांना दोन पत्नी आहेत, म्हणजे अनेकांनी दोन विवाह केले आहेत. अशी डझनभर उदाहरणे आहेत. धारवाड आणि दक्षिण कन्नडसारख्या भागांतून आलेल्या अनेक नेत्यांची नावं सांगू शकतो. पण सध्या मी ते टाळतो”, असं वक्तव्य डी.के.शिवकुमार यांनी केलं आहे.दरम्यान, कर्नाटकच्या विधानसभेत गुरुवारी बंगळुरूमधील वाढत्या लोकसंख्येबाबत बोलताना डी.के.शिवकुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे. बंगळुरू शहरात येणारे या ठिकाणीच स्थायिक होतात असं सांगत डी.के.शिवकुमार यांनी कर्नाटकातील इतर भागांतून बंगळुरू शहरात स्थायिक झालेल्या आमदारांचा उल्लेख केला.धारवाड आणि दक्षिण कन्नड यांसारख्या जिल्ह्यांतील आमदारांची नावं आपण सांगू शकतो असंही शिवकुमार यांनी म्हटलं आहे. मात्र, कर्नाटक राज्याच्या इतर भागांतून बंगळुरूला स्थायिक झालेल्या आमदारांविषयी डी.के.शिवकुमार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
डी.के.शिवकुमार यांच्यावर भाजपाची टीका
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर.अशोक यांनी डी.के.शिवकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. डी.के.शिवकुमार यांचं हे वक्तव्य अनावश्यक असल्याचं म्हणत त्यांनी संबंधित आमदारांची नावं जाहीर करावीत, असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भाजपाचे ज्येष्ठ नेते एस.सुरेश कुमार यांनी म्हटलं की, “मुख्यमंत्र्यांनी ती टिप्पणी जरी विनोदाने केली असली तरी सभागृहात केलेली अशी वक्तव्ये विधानसभेच्या प्रतिष्ठेला बाधा आणतात.”
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.