🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपचा ३५ कोटींचा भूखंड दरोडा! उपायुक्तांचा शेरा धुडकावून बेकायदेशीर ठराव घुसडला; विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाणांचा सनसनाटी आरोप

भाजपचा ३५ कोटींचा भूखंड दरोडा! उपायुक्तांचा शेरा धुडकावून बेकायदेशीर ठराव घुसडला; विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाणांचा सनसनाटी आरोप


सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत भाजप सत्ताधाऱ्यांनी ३५ कोटी रुपयांचा भूखंड दरोडा टाकल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे. शासनाने युएलसी कायद्यांतर्गत महापालिकेला वर्ग केलेल्या साडेसात एकर जागेतील सव्वातीन एकर जागा तडजोडीच्या नावाखाली खाजगी व्यक्तींच्या घशात घालण्याचा कुटील डाव भाजपने आखला आहे.

उपायुक्तांचा स्पष्ट प्रतिकूल शेरा असतानाही २० ऑगस्ट २०२६ च्या महासभेत ऐनवेळचा विषय दाखवून हा बेकायदेशीर ठराव घुसडण्यात आल्याचे उघडकीस आल्याने महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ​या दरोड्याविरोधात आता न्यायालयात आणि रस्त्यावर आरपारची लढाई लढण्याचा पवित्रा काँग्रेसने घेतला असून, महापालिकेसमोर तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.

​उपआयुक्तांची टिपणी धुडकावली; इतिवृत्तही गायब!
पत्रकार परिषदेत माहिती देताना मंगेश चव्हाण म्हणाले, "मिरजेतील साडेसात एकर जागा युएलसीतून मिळालेली असून उच्च व सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच महापालिकेच्या बाजूने निकाल दिलेला आहे. या जागेबाबत कोणताही तडजोडनामा करता येणार नाही, असा स्पष्ट शेरा उपायुक्त स्मृती पाटील यांनी ३ ऑगस्ट रोजी दिलेला होता. 

मात्र, अधिकाऱ्यांचा हा शेरा आणि न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवून भाजपने भूखंडमाफियांप्रमाणे काम करत बेकायदेशीर ठराव संमत केला आहे. भाजप ही दरोडेखोरांची पार्टी आहे!" ​तसेच, २० ऑगस्टच्या महासभेची कागदपत्रे आणि इतिवृत्त नगरसचिव कार्यालयातून गायब असल्याचा गंभीर आरोप करत नगरसचिवांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ठराव न मिळाल्यास नगरसचिवांच्या तोंडाला काळे फासण्याचा थेट इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.
​राष्ट्रवादीचाही ठरावाला विरोध; महापौरांवर फसवणुकीचा आरोप

दुसरीकडे, भाजपसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनीही या ठरावावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. "महापौरांनी कोणतीही कल्पना न देता, संयुक्त पार्टी मिटिंगमध्ये चर्चा न करता हा ठराव अत्यंत संगनमताने आणि फसवून घुसडला आहे," असा घणाघाती आरोप बागवान यांनी केला. हा ठराव विखंडित (रद्द) करण्यासाठी आयुक्त संजीता महापात्र व नगरविकास विभागाकडे पत्र दिले असून न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विरोधी पक्षनेते चव्हाण यांनी ही बाब वेळीच लक्षात न आणल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणीही बागवान यांनी केली.

भाजप नगरसेवकाचाही प्रशासनावर निशाणा
विशेष म्हणजे, भाजपचे नगरसेवक संतोष पाटील यांनीही या ठरावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. "उच्च व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महापालिकेच्या बाजूने असताना कोणाचे तरी उखळ पांढरे करण्यासाठी ही तडजोड केली जात आहे. चुकीचा ठराव सभागृहात आणल्याबद्दल प्रशासनही तितकेच जबाबदार आहे," असे सांगत त्यांनी घरचा आहेर दिला. एकंदरीत, ३५ कोटींच्या या भूखंड घोटाळ्यावरून महापालिकेतील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजप सत्ताधारी बॅकफूटवर आले आहेत.
​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.