🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाकीचा धाक संपला? कळंबा जेलमध्ये कैदी आक्रमक; वरिष्ट अधिकाऱ्याला धमकी देऊन रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण

खाकीचा धाक संपला? कळंबा जेलमध्ये कैदी आक्रमक; वरिष्ट अधिकाऱ्याला धमकी देऊन रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण


कोल्हापूर: 'तू लई नियमानं वागतोस, शांत राहा, नाहीतर बाहेर गेल्यावर तुला सोडणार नाही,' अशी धमकी देत 'मोका'तील सहा कैद्यांनी कळंबा कारागृहातील वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रकाश फुन्नू चव्हाण (वय ५०, रा.साळोखेनगर) यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी सकाळी कारागृहातील मंडल अधिकारी कार्यालयात घुसून कैद्यांनी चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

यावेळी एका कैद्याने दगडाने त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो चुकवताना दगड डाव्या हाताच्या पंज्यावर लागल्याने चव्हाण जखमी झाले. याप्रकरणी अल्ताफ शरीफ, भारत राजू शेट्टी, विनायक संभाजी चौगुले, आशुतोष संतोष वर्तले, आदम मोहम्मद मुजावर आणि शाहिद मन्सूर यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दंगा करणाऱ्या कैद्यांना सुनावले
प्रकाश चव्हाण हे कळंबा कारागृहात वरिष्ठ तुरुंगाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. १४ सप्टेंबर रोजी कारागृहातील सर्कल क्रमांक एकमधील बॅरेक क्रमांक तीन आणि चारमध्ये काही कैदी गोंधळ घालत होते. आरडाओरडा सुरू झाल्याने चव्हाण घटनास्थळी गेले. कारागृहातील शिस्त मोडू नका आणि दंगा करू नका, अशा सूचना त्यांनी कैद्यांना दिल्या. या घटनेनंतर कैद्यांमध्ये चव्हाण यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
केबिनमध्ये घुसून मारहाण

बुधवारी सकाळी सहा कैदी अचानक मंडल अधिकारी कार्यालयात घुसले. त्यांनी चव्हाण यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कैदी अल्ताफ शरीफ याने दगडाने चव्हाण यांच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला चुकवण्यासाठी चव्हाण यांनी डावा हात वर केला. त्यामुळे दगड त्यांच्या हाताला लागला आणि ते जखमी झाले. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. कारागृहातील अधिकाऱ्यावरच कैद्यांनी हल्ला केल्याने सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सहा कैद्यांचे स्थलांतर होणार
या घटनेनंतर संबंधित सहा कैद्यांना कळंबा कारागृहातून अन्य कारागृहात हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाने त्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. अल्ताफ शरीफ, भारत शेट्टी, विनायक चौगुले, आशुतोष वर्तले, आदम मुजावर आणि शाहिद मन्सूर यांना अमरावती, नागपूर किंवा येरवडा कारागृहात हलवण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांचे स्थलांतर केले जाणार आहे. दरम्यान, हल्ल्यामागील नेमकी कारणे, कैद्यांमध्ये झालेला वाद आणि कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेबाबत पोलिस तसेच कारागृह प्रशासनाकडून पुढील तपास केला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.