मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: म्हैसाळमध्ये बेकायदेशीर सुगंधी तंबाखू अन् मावा जप्त; २०,५०० रुपयांच्या मुद्देमालासह तिघे जेरबंद!
मिरज :- शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखू व माव्याची बेकायदेशीरपणे साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मिरज ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. म्हैसाळ (ता. मिरज) येथील एस.टी. स्टँड परिसरातील एका पानपट्टीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे २०,५०० रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी म्हैसाळ हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.उपनिरीक्षक प्रवीण यादव आणि पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे यांना म्हैसाळ येथील 'हॉटेल वैभव' जवळ असलेल्या 'अविनाश पान शॉप'मध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व माव्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची शहानिशा केल्यानंतर, वरिष्ठांच्या सूचनेनुसार अन्न व औषध प्रशासन (सांगली) चे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार आणि प्रणव जिनगर यांना पाचारण करण्यात आले. दोन पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान शासनाने बंदी घातलेला मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला.
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹२०,५००/-):
तयार मावा: ५०० ग्रॅम (किंमत ₹५००/-)
विनालेबल सुगंधी तंबाखू (ट्रान्सपरंट पाऊच): १० किलो / २० सीलबंद पाऊच (किंमत ₹१०,०००/-)
विनालेबल सुगंधी तंबाखू (काळे पाऊच): ४ किलो / ८ सीलबंद पाऊच (किंमत ₹४,०००/-)
विनालेबल सुगंधी तंबाखू (लाल पाऊच): ६ किलो / १२ सीलबंद पाऊच (किंमत ₹६,०००/-)
अटक केलेले आरोपी:
१. तानाजी अण्णासो दबडे (वय ३६, रा. कागवाड बसवनगर, ता. कागवाड, जि. बेळगाव) - पानपट्टी चालक२. अविनाश अशोक शिंदे (वय ४८, रा. म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली) - पानपट्टी मालक३. विशाल शशिकांत पिंपळे (वय ४४, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हा प्रतिबंधित साठा कर्नाटक राज्यातून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. जप्त केलेल्या मालाचे रासायनिक तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. आरोपींवर बी.एन.एस. आणि 'अन्न व सुरक्षा मानके कायद्या'च्या विविध कलमांनुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.कारवाई करणारे पथक:ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मिरज) अजित कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहा. पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, श्रेणी पो.उपनिरीक्षक प्रकाश साळुंखे, स.पो.उपनिरीक्षक प्रवीण यादव, अंमलदार मधुकर मदवान, राजेंद्र बाबर, अमोल ढोले, वसंत कांबळे, विनायक कडाळे, सविता कसबे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार व प्रणव जिनगर यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.