पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी अत्यंत मोठी आणि धडक कारवाई करत थेट वर्ग-१ च्या सर्वोच्च तांत्रिक पदावरील अधिकाऱ्याला लाचखोरीच्या जाळ्यात पकडले आहे.
महापालिकेचे मुख्य अभियंता (क्रमांक २) प्रमोद सुधाकर ओंबासे यांना एका ठेकेदाराकडून १९ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे एसीबीच्या पथकाने थेट महापालिकेच्या मुख्य इमारतीतील त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले आहे. महापालिकेतील इतक्या बड्या अधिकाऱ्यावर थेट दालनातच एसीबीने धाड टाकल्याने महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात एकच प्रचंड खळबळ उडाली आहे.
ठेकेदाराच्या तक्रारीवरून सापळा
एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ठेकेदाराला महापालिकेचे विकासकाम (पाईपलाईन व इतर कामे) मिळवून देण्यासाठी आणि त्यासंबंधीची फाईल पुढे सरकवण्यासाठी मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांनी १९ हजार रुपयांच्या लाचेची उघड मागणी केली होती.
लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने संबंधित ठेकेदाराने थेट पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने अत्यंत गोपनीयरीत्या या तक्रारीची पडताळणी केली असता, ओंबासे यांनी कामाच्या बदल्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
महापालिकेच्या इमारतीत एसीबीची धडक एन्ट्री
लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य मुख्यालयात सापळा रचला. गुरुवारी कार्यालयात कामाची लगबग सुरू असतानाच, ठेकेदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्याच्या तयारीत असताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने थेट मुख्य अभियंत्यांच्या दालनावर छापा टाकला आणि ओंबासे यांना जागेवरच ताब्यात घेतले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे पालिकेतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली.
आचारसंहितेच्या काळातही लाचेची हाव
विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता संपत असतानाच्या संवेदनशील काळातही इतक्या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ओंबासे यांच्याकडे महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकीसह अनेक महत्त्वाच्या विभागांचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांच्या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स ताब्यात घेतल्या असून, त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची आणि अटकेची पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.