बीड जिल्ह्यात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाल्याने खरा प्रकार समोर आला आहे. एकीकडे लहान मुलांसाठी 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' राबवून लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, प्रत्यक्षात मात्र बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील दिंदूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
शाळेत अचानक फीट येऊन बेशुद्ध पडलेल्या एका 11 वर्षाच्या मुलीला उपचारासाठी आणले असता रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून तिला व तिच्या हतबल वडिलांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आले. या घटनेचा संतापजनक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
नेमकी घटना काय आहे?
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील दिंड्रूड गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला 29 सप्टेंबर रोजी सकाळी शाळेत असताना अचानक फीट आली. ती बेशुद्ध पडल्याने शाळेचे मुख्याध्यापक मनोहर कटारे इतर शिक्षक सहकाऱ्यांनी तिला तातडीने दिंदूड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश ढाकणे यांनी तिला पुढील उपचारासाठी रेफरचा सल्ला दिला.मात्र, या चिमुकलीसबोत आधीच नियतीने घाला घातला होता. या मुलीचे आईचे छत्र हरपले असून तिचे वडील हमाली करून दोन मुले व दोन मुर्लीचा सांभाळ करतात. वृद्ध आजी या मुलांची देखभाल करते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणारे हे कुटुंब रुग्णवाहिकेसाठी गयावया करत होते मात्र मदतीसाठी कोणीच समोर आले नाही. रुग्णवाहिकेला देण्यासाठी त्या बापापाशी पैसे नव्हते म्हणून आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे डिझेलच्या पैशांची मागणी केली. रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या या कुटुंबाकडे पैसे नसल्याने त्यांना थेट रुग्णवाहिकेतून खाली उतरवले. अन् रुग्णवाहिका चालकाने त्या चिमुकल्या मुलीला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास नाकारल्यानंतर चिमुकलीला खांद्यावर टाकून घेऊन जाताना हतबल वडील, तर मागे तिची आजी चालतच गेली.
सांभाळ होत नाही तर लेकरं पैदा कशाला करता?
यावेळी भावनिक झालेल्या आजीने त्या डॉक्टराना म्हणाल्या "आमच्याकडे खायलाच पैसे नाहीत, मग डिझेलला कुठून आणून देऊ? चार लेकरांचा सांभाळ कसाबसा करतोय," अशी आर्त हाक मारली. त्यावर समोर उभ्या असलेल्या डॉक्टराने अत्यंत बेजबाबदार व उद्धटपणे म्हणाला की, "सांभाळ होत नाही तर लेकरे पैदा कशाला करता" असे म्हणून आज्जीवरच रुबाब गाजवला. वेळ कमी होता चिमुकलीचा प्रकृती चिंताजनक होती अश्या परिस्थितीत बापाने क्षणाचा विलंब न करता त्या मुलीला आपल्या खांद्यावर घेऊन जाताना सर्व पाहत होते अत्यंत हतबल झालेला तो बाप आपल्या बेशुद्ध लेकराला पुन्हा खांद्यावर टाकून, वृद्ध आईला सोबत घेऊन रुग्णालयाच्या बाहेर चालत निघाला.
आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी हा भयानक प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत समोर आल्यानंतर जिल्हाभरातून या निष्ठुर आरोग्य कर्मचाऱ्यांवर आणि डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. रुग्णवाहिका ही गर्भवतींसाठी असते; पण तरीही मी असे बोलायला नको होते. माझी चूक झाली आहे, असे दिंदूडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश ढाकणे यांनी सांगून दिलगिरी व्यक्त केली आहे.
कारवाई करू- जिल्हा आरोग्य अधिकारी
डिझेलसाठी पैसे मागणे आणि रुग्णाच्या नातेवाइकांना उद्धट कोणी बोलले असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. मी सर्व माहिती घेतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.