🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीकरांसाठी अभिमानाची बातमी! कृष्णा नदीत पहिल्यांदाच नोंदवले गेले 'पाणमांजर'; संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध

सांगलीकरांसाठी अभिमानाची बातमी! कृष्णा नदीत पहिल्यांदाच नोंदवले गेले 'पाणमांजर'; संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध



सांगली : सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी परिसरात पाणमांजराची प्रथमच नोंद करण्यात आली  आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनावर आधारित लेख 'एशियन जर्नल ऑफ बायोलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

पीडीव्हीपी महाविद्यालय (तासगाव) येथील डॉ. नरेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी.साठी संशोधन करणारे बबलू जगन्नाथ हरुगडे, वन्यजीव अभ्यासक मेघदीप कुदळे, मंदार शिंपी, सचिन साळुंखे यांनी या संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाणमांजर हा नदी व जलस्रोतांच्या परिसरात आढळणारा महत्त्वाचा वन्यजीव आहे. नदीच्या परिसंस्थेतील अन्नसाखळी आणि पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टीने या प्राण्याला विशेष महत्त्व आहे. कृष्णा नदी परिसरात पाणमांजराची नोंद होणे ही सांगली जिल्ह्यातील जैवविविधतेच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.





या संशोधनामुळे कृष्णा नदी परिसरातील वन्यजीवांचे अस्तित्व, त्यांचा नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पुढील अभ्यासाला दिशा मिळणार आहे. नदीचे प्रदूषण, अधिवासाचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर अशा संशोधनाचे महत्त्व अधिक वाढले आहे. या संशोधनासाठी मार्गदर्शन करणारे डॉ. नरेंद्र कुलकर्णी, संशोधक बबलू जगन्नाथ हरुगडे तसेच मेघदीप कुदळे, मंदार शिंपी, सचिन साळुंखे यांच्या योगदानाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.

पाणमांजराविषयी...

पाणमांजर हा एक मांसाहारी, सस्तन आणि प्रामुख्याने पाण्यात राहणारा प्राणी आहे. त्याचे मुख्य भक्ष्य नदीतील मासे, बेडूक, कासव, नदीतील साप, खेकडे खातात. ही पाणमांजरे नदीकिनारी बिळात किंवा मोठ्या दगडांच्या खाचा आणि झाडांच्या मुळांच्या सावलीत राहतात. ती स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त जलाशयांमध्येच वास्तव्यास असतात. भारतात पाणमांजराच्या प्रामुख्याने तीन प्रजाती आढळतात. त्यात गुळगुळीत खालीचे पाणमांजर, लहान-पंजे असलेले आशियायी पाणमांजर, युरेशियन पाणमांजर अशा प्रजाती आहेत. त्यात सांगलीत दिसलेले पाणमांजर हे गुळगुळीत खालीचे आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची १ नुसार या सर्व प्रजाती पूर्णपणे संरक्षित आहेत आणि आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाद्वारे यांना धोक्यात आलेल्या/असुरक्षित प्रजातींमध्ये वर्गीकृत केले आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.