मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतमध्ये सभा घेत सरकारवर टीका केली. तसंच या सगळ्याला मोदी आणि शाह यांच्या आदेशावरून हे सगळं चाललं आहे. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना काहीही किंमत नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
इंटरनेट बंद केलंय, या भव्य नेटवर्कचं काय कराल?
इंटरनेट बंद केलं आहे इथलं असं मी ऐकलं, इंटरनेट बंद केलं तरीही सूर्य उगवायचा थांबतो का? कोणत्या जगात ही माणसं राहतात मला कळत नाही. इथे बंद केलं आहे इंटरनेट पण संपूर्ण जग पाहतं आहे त्याचं काय? इंटरनेट बंद करून काय होणार या नेटवर्कचं काय करायचं? असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कर्जतच्या इंटरनेट बंदवर त्यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच भाष्य केलं. कर्जतच्या जंगलाची राज ठाकरेंनी पाहणी केली. त्यानंतर आपल्या शैलीत भाषण करत सरकारला धारेवर धरलं.
मला वाटलं मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलो आहे-राज ठाकरे
आज जंगलतोड झाली तिथे मी गेलो होतो, तोडलेली लाकडं रचून ठेवली होती. ते बघताना मला वाटलं जंगलाच्या अंतिम संस्काराला आलो आहे. इतक्या वर्षांची जुनी झाडं, कोणत्या तरी गुजरात्यासाठी म्हणून कापून टाकत आहेत. मला सांगा या प्रकल्पाची गरज काय आहे? या सगळ्या गोष्टींच्या मागचं षडयंत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील यांना केंद्रात जे दोघं बसलेत यांच्याकडून शून्य किंमत आहे असंही राज ठाकरे कर्जतच्या सभेत म्हणाले.
मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे..
राज ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही जे सांगू ते महाराष्ट्रात झालं पाहिजे. हा जमिनीचा तुकडा, जंगलाचा तुकडा आम्ही सांगतो त्याला देऊन टाका. हे सगळं वरती ठरतं. मी विधानसभेच्या वेळी पुन्हा सांगत होतो महाराष्ट्र जर यांच्या हाती गेला तर दोन माणसांच्या हाती महाराष्ट्र जाईल आणि ते वाट्टेल ते करतील. ही हिंमत येते कुठून? ही हिंमत येते तुमच्यातूनच. मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. आज रडत बसायचं, राजकीय पक्षांकडे जायचं, त्यांना सांगायचं आमच्यावर अन्याय होतोय वगैरे.
निवडणुकीच्या तोंडावर जातीच्या नावावर, धर्माच्या नावार किंवा पैशांसाठी मतदान यांना करायचं. मग हे निवडून येणार, पुन्हा तुमच्यावर वरंवटा फिरवणार, पुन्हा परिस्थिती तीच होणार. असं वागण्याचं कारणीभूत निवडणुकीच्या तोंडावर आत्तापर्यंत कुणाला मतदान केलं, कुणाला निवडून दिलं यात लपलं आहे. ३०-३५ टक्के जनता आणि बाकी निवडणूक आयोग आहेच. माता-भगिनींना १५०० रूपये लाडकी बहीण योजनेतून. अशा योजनांमधून तुम्हाला विकत घेतलं जातं आहे आणि तुमची तोंडं बंद केली जात आहेत.
तुमच्यावर हात जोडायची वेळ का येते?
महाराष्ट्रात सत्तेत बसलेले लोक आहेत त्यांच्या हातात काहीच नाही. मुख्यमंत्र्यांचं निवेदन मी त्यादिवशी ऐकलं. त्यांनीच सांगितलं की केंद्राने ठरवलं आणि खासगी कंपनीने ठरवलं आणि मग हा प्रस्ताव आम्हाला दिला हे त्यांनीच सांगितलं. मी तुम्हाला म्हणालो तसं हे सगळं वरती ठरतं. उद्योगपती मोदी आणि शाह यांना भेटतात आणि सांगतात की आम्ही जमीन पाहिली आहे आम्हाला प्रकल्प उभारायचा आहे. मग वरून खाली फोन येतात. मग पोलिसांसारखं वागायचं. सिनीयर आला की सॅल्युट करतात. सत्तेची भीती, पदाची भीती वाटते म्हणून हे पण तसंच वागतात.
गप्प राहणारा, शांत राहणारा, मान खाली घालून चालणारा असा महाराष्ट्र का? गुजरातचे दोन माणसं महाराजांचा महाराष्ट्र चालवणार का? आमचा सह्याद्री पोखरणार का? आणि आम्ही हतबल झालो आहोत. आज गावातल्या महिला मला येऊन भेटल्या. हातात लेकरु होतं त्यांच्या, जंगल वाचवा म्हणत होत्या. तुमच्यावर हात जोडायची वेळ येते? तुमचे कोयते काय करतात? कोयते काय फक्त फांद्या छाटायला आहे का? जव्हार, मोखाड्यावरून ते माणसं आणत आहेत झाडं कापायला. त्यांनाही सांगतो आहे आज कर्जतच्या लोकांच्या दारावर टकटक झाली आहे उद्या हेच तुमच्याबाबतीतही घडणार. तुमच्यावरही वरवंटा फिरणार, असं राज ठाकरे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.