महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा बसत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये अग्रीम मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर ही घोषणा केली.
मात्र, सरकारच्या शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होतेय. शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत 5 हजार रुपयांच्या मदतीतून काय साध्य होणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात सरकारने भरघोस मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
'5 हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची?'
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली 5 हजार रुपयांची मदत पुरेशी नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नुकसान मोठं असताना मदत मात्र तुटपुंजी मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पिकांच्या नुकसानीचा विचार करून सरकारने अधिक आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारने दिवाळीपूर्वी अग्रीम पाच हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचं निर्णय घेतला.ही मदत हेक्टरी आहे, एकरी आहे, प्रति माणसी आहे की प्रति सातबारा आहे, हे स्पष्ट करायला पाहिजे.पाच हजारात दिवाळी होणं शक्य नाही. असं शेतकरी म्हणत आहेत. सरकारचे पाच हजार घेऊन करायचे काय? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.धाराशिव जिल्ह्यातही शेतकरी सरकारच्या निर्णयावर नाराज आहेत. महागाई वाढली आहे, शेतात काहीच पिकलं नाही, अशा परिस्थितीत 5 हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. एका तेलाच्या डब्यासाठी अडीच हजार रुपये खर्च करावे लागत असतील, तर उरलेल्या पैशांत कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.शेतीतून उत्पन्न मिळालं नाही, तर घरखर्च, दवाखान्याचा खर्च आणि सणासुदीचा खर्च भागवायचा कसा, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर अधिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांना मदत, पण शेतमजुरांचं काय?
दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसत नाही, तर शेतमजुरांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. शेतात कामच उपलब्ध नसल्याने मजुरी मिळत नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतमजूर उपस्थित करत आहेत. सरकारने अशी मदत केल्यापेक्षा मेलेलं बरं, सरकारने कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये मदत करावी अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. एकीकडे दुष्काळामुळे हातात उत्पन्न नाही, तर दुसरीकडे महागाईमुळे खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर दोघेही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पाच हजार रुपयात शेतकऱ्यांचे दोन ड्रेस देखील येत नाहीत मग आम्ही दिवाळी कस काय करायची. मुख्यमंत्र्यांनी विचार करून जास्त मदत करायला पाहिजे होती. असे म्हणत शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली .
सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये अग्रीम मदत जमा करण्याची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्ष शेतीचं झालेलं नुकसान लक्षात घेऊन मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.सरकारच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा असली, तरी ही मदत पुरेशी नसल्याची भावना हिंगोली आणि धाराशिवमधील शेतकरी व्यक्त करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.