बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघांचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड कधी आपल्या कृतीने तर कधी जहाल भाषेमुळे वादग्रस्त ठरतात. अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्री ते राहुल गांधी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी केलेली टीका, विधाने, अन्य व्यक्तीविरुद्ध केलेली शिवराळ भाषा वादंगाचा विषय ठरतो. त्यामुळे आमदार गायकवाड म्हणजे वादग्रस्त विधाने आणि त्यांची विधाने म्हणजे राजकीय वादंग, वादळ असे समीकरण तयार झाले आहे.
आता आमदार गायकवाड यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल प्रतिक्रिया देताना वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर हे धम्मप्रवर्तन दिन कार्यक्रमनिमित्त बुलढाणा शहरात आले होते. यावेळी त्यांनी शेतकरी नालायक आहे, असे विधान वेगळ्या संदर्भात (अर्थाने) केले होते. शेतकऱ्यांसाठी ज्यांनी संघर्ष केला किंवा करीत आहे अशा नेत्यांना शेतकरी मतदान करत नाही, असे ते सखेद म्हणाले होते.
काय म्हणाले आमदार?
प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावर काही मोजक्या प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधीनी आमदार गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली. यावर संजय गायकवाड यांनी आंबेडकरांच्या विधानाचे अप्रत्यक्ष समर्थन केले. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ नये असे विधान केले. आपली अर्धांगिनी, मुलांना वाऱ्यावर सोडून हे शेतकरी आत्महत्या करतात. बायकोसोबत सात जन्माची शपथ घेतात, सात फेरे घेतात. मात्र आत्महत्या करतात. त्यामुळे यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नये. त्यांना जनावरे खातील, तेंव्हा कसे हाल होतात याची जाणीव होईल, तेंव्हा ते आत्महत्या करणार नाही असेही आमदार यावेळी म्हणाले.
आमदार खासदाराला चिठ्ठी लिहा, मदतीसाठी येऊ…
शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी दहा-बारा पुढाऱ्यांना मारावे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते त्यानंतर बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल तर त्याने आमदार खासदार यांना चिठ्ठी लिहावी आम्ही सर्व मिळून त्याची मदत करू. मात्र, शेतकरी कुठल्याही विचार न करता आत्महत्या करतात..त्यामुळे त्यांच्या मातीवरही जाऊ नये असे ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.