आंदोलने आणि निदर्शनांच्या मार्गाने काहीही साध्य होत नाही, जर निवडणूक जिंकायची असेल तर विरोधकांनी जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. दिल्लीच्या बाहेरील भागात दिल्ली जल मंडळाच्या ८,९४१ कोटी रुपयांच्या ३३ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते.
राजकीय कसरतींनी जनादेश बदलता येत नाही
राजकीय कसरती आणि जमावशाहीचा वापर करून जनतेचा कौल नाकारता येणार नाही, असे स्पष्ट करत अमित शाह म्हणाले की, “ज्या राज्यांत तुम्ही सत्तेत आहात, तिथे लोककल्याणकारी योजना राबवा, अन्यथा उरलेल्या ठिकाणांहूनही तुमचा राजकीय पाया पूर्णपणे नष्ट होईल.” भाजपाच्या विजयावर विरोधकांकडून ‘मतचोरी’चे जे आरोप केले जात आहेत, त्याला प्रत्युत्तर देताना घुसखोरांची मते वाचवण्यासाठीच हा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘भाजपापुढील ३० वर्षे सत्तेत राहील’
काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणामुळे पुढील ३० वर्षे त्यांना सरकार स्थापन करता येणार नाही, असा ठाम दावा शाह यांनी केला. “मी जेव्हा ३० वर्षे भाजपा सत्तेत राहील असे म्हणतो, तेव्हा ते पुन्हा मतचोरीचे आरोप करतात. मात्र, तुमच्या नकारात्मक राजकारणामुळेच तुम्हाला सत्तेत येता येणार नाही,” असे ते म्हणाले. तसेच, केरळ, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणामध्ये विरोधकांचे सरकार येते तेव्हा ‘ईव्हीएम’ आणि निवडणूक आयोग चालतात, मात्र स्वतःचा पराभव झाला की त्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, अशी टीकाही त्यांनी केली.
मे २०२९ पर्यंत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन
दिल्लीतील पर्यावरणीय समस्यांवर बोलताना, यमुना नदीच्या प्रदूषणासाठी शाह यांनी काँग्रेस आणि ‘आप’च्या मागील सरकारांना जबाबदार धरले. मात्र, केंद्र सरकार, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकार एकत्रितपणे कालबद्ध योजना राबवत असून, आगामी “मे २०२९ पर्यंत स्वच्छ यमुना नदी घेऊन जनतेसमोर येऊ,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.